दादांचे मुरबाडमधील 'ते' शेवटचे शब्द… कधीही विसरता येणार नाहीत [Kishor Gaikwad]
ठाणे/मुरबाड | किशोर गायकवाड
साधारण चार महिन्यांपूर्वी विजयादशमीच्या पवित्र दिवशी, दि. २ ऑक्टोबर रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार मुरबाडमध्ये आले होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नवीन जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन आणि भव्य कार्यकर्ता मेळाव्याच्या निमित्ताने झालेली ही भेट मुरबाडकरांच्या मनात खोलवर घर करून राहिली आहे. त्या दिवशी उच्चारलेले प्रत्येक शब्द, दिलेला प्रत्येक सल्ला आणि केलेली प्रत्येक कानटोचणी आजही त्यांच्या आठवणींना अधिकच हळवे करून जात आहे.
त्या दिवशी दादांना पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी मुरबाड शहरासह संपूर्ण तालुक्यातून नागरिक, कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विविध पक्षांतील कार्यकर्त्यांनी दिलेली निवेदने त्यांनी स्वीकारली तथा अत्यंत संयमाने ऐकून घेतली होती. जे प्रश्न मार्गी लावता येतील ते नक्की सोडवू, आणि जे शक्य नाही ते स्पष्टपणे सांगू, असे त्यांनी ठाम शब्दांत सांगितले होते. हीच त्यांची राजकीय ओळख, प्रामाणिक, थेट आणि स्पष्ट; मुरबाडवासीयांनी त्यांच्या स्पष्ट वक्तेपणाचा तो अनुभव प्रत्यक्ष घेतला होता.
अजित पवार (Ajit Pawar) यांच्या चाळीस वर्षांच्या प्रदीर्घ राजकीय कारकीर्दीत ते अनेक वेळा मुरबाडमध्ये आले होते. निवडणुका, कार्यकर्ता मेळावे, सामाजिक कार्यक्रम अशा विविध निमित्तांनी मुरबाडशी त्यांचे नाते अधिक घट्ट होत गेले होते. तालुक्यातील हिंदुराव व पवार कुटुंबांशी त्यांचे अतिशय जिव्हाळ्याचे संबंध होते. त्यांच्या आग्रहाखातर अनेकदा त्यांनी मुरबाडला भेट दिली. त्यामुळेच मुरबाड हे केवळ एक राजकीय केंद्र नव्हते, तर त्यांच्या मनाच्या जवळचे ठिकाण होते.
आज त्यांच्या जाण्याने मुरबाडमधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अक्षरशः पोरका झाल्याची भावना कार्यकर्त्यांतून व्यक्त होत आहे. “दादा गेले आणि आपला आधार हरपला,” अशा प्रतिक्रिया ऐकायला मिळत आहेत. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या कार्यकर्त्यांनाही अजित पवार यांच्याविषयी अपार प्रेम आणि आदर होता. त्या प्रेमाच्या ऋणातूनच मुरबाड शहरात विविध ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे.
“एकतर कॉन्ट्रॅक्टर बना, नाहीतर पुढारी बना” दादांची मुरबाडमध्ये परखड कानटोचणी....
दादांच्या प्रमुख उपस्थितीत त्यादिवशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नवीन जनसंपर्क कार्यालयाचा भव्य उद्घाटन सोहळा आणि जाहीर मेळावा मुरबाड शहरात पार पडला होता. यावेळी त्यांच्या समवेत व्यासपीठावर आमदार दौलत दरोडा, पक्षाचे राज्य उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव, युवा जिल्हाध्यक्ष प्रतिक हिंदुराव, नाझिम मुल्ला, हेमलता पाटील, आनंद परंजपे, मेडिकल असोसिएशनचे आप्पासाहेब शिंदे, भरत गोंधळे, माया कतारिया, प्रवीण खरात, तालुकाध्यक्ष चंद्रकांत बोष्टे यांच्यासह अनेक नेते व पदाधिकारी उपस्थित होते.
उपस्थितांना संबोधित करताना दादांनी तब्बल ४२ मिनिटे परखड, थेट आणि आशयपूर्ण भाषण केले होते. भाषणाच्या सुरुवातीलाच काही आदिवासी बांधवांनी दिलेल्या निवेदनाचा उल्लेख करत त्यांनी व्यक्त केलेली खंत मनाला चटका लावणारी ठरली. ७८ वर्षे उलटूनही काही आदिवासी पाड्यांमध्ये पिण्याच्या पाण्याची कायमस्वरूपी योजना नाही, ही बाब अत्यंत दुर्दैवी आहे. याबाबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी थेट संपर्क साधणार असल्याचे त्यांनी जाहीर केले होते.
पंतप्रधान आवास योजनेंतर्गत देशभरात तीन कोटी घरे गरजूंना देण्यात येणार असून, त्यातील सुमारे वीस लाख घरे एकट्या महाराष्ट्रात मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले होते. यासाठी अटी व शर्ती शिथिल करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली होती. कार्यक्रमस्थळी येताना रस्त्यांवरील खड्ड्यांतून केलेल्या प्रवासाचा उल्लेख करत, कामांचा दर्जा चांगला असला पाहिजे, कारण झालेला रस्ता किमान २५ ते ३० वर्षे टिकला पाहिजे, असे ठाम मत त्यांनी मांडले होते. अतिवृष्टीमुळे ज्या घरांमध्ये पुराचे पाणी शिरले आहे, त्यांचे पंचनामे करून दिवाळीपूर्वी नुकसानभरपाई थेट खात्यात जमा केली जाईल, हे आश्वासन दादांच्या शब्दांतून मिळाले होते. यासाठी केंद्र सरकारकडून निधी, राज्य सरकारकडून मदत तसेच दानशूर लोकांकडून सहकार्य घेण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी त्यावेळी सांगितले होते. तर चांगल्या पगारावर काम करणाऱ्यांनी एक दिवसाचा पगार मदतीसाठी द्यावा, असे दादांच्या आवाहनावर झालेला टाळ्यांचा गजर अजूनही कानांमध्ये मुरबाडकरांना जाणवत आहे.
भाषणादरम्यान त्यांनी दिवंगत लोकनेते शांतारामभाऊ घोलप यांचे स्मरण करायला विसरले नाही. तर पुढे लगेच कार्यकर्त्यांना उद्देशून “आळस झटकून सकाळी लवकर उठा आणि कामाला लागा,” असा थेट संदेश दिला होता. सरकार जिल्ह्याच्या ठिकाणी एक मेडिकल कॉलेज व एक नर्सिंग कॉलेज देत असल्याचे सांगून, बंद पडलेल्या एमआयडीसीबाबत कारणे शोधून पाठपुरावा करण्याचा सल्लाही त्यांनी कार्यकर्त्यांना दिला होता. मुरबाड तालुक्यातील अपुऱ्या वीजपुरवठ्यावर उपाय म्हणून स्वतंत्र सब-स्टेशनचा पर्याय त्यांनी सुचविला होता. पाठपुरावा केल्याशिवाय कामे होत नाहीत, हे सूचक विधान त्यांनी कार्यकर्त्यांसमोर केले होते. मुरबाड रेल्वे प्रकल्पासाठी प्रमोद हिंदुराव यांनी अधिकाऱ्यांशी सातत्याने संपर्क ठेवावा, तसेच दिल्लीला आठवण करून देण्याची दक्ष कामगिरी त्यांनी त्यावेळी हिंदुराव यांना दिली होती. पालघर जिल्ह्यातील वाढवण बंदर हे जगातील दहाव्या क्रमांकाचे बंदर होणार असून त्यासाठी सुमारे एक लाख कोटी रुपयांचा खर्च होत असल्याचे त्यांनी सांगितले होते. यामुळे लाखो रोजगाराच्या संधी निर्माण होतील, असे त्यांनी नमूद केले होते. जमिनी विकू नका तसेच कोणालाही बेघर केले जाणार नाही, असा विश्वास देताना या प्रकल्पाचे भूमिपूजन खुद्द पंतप्रधानांनी केल्याची माहितीही दिली होती.
पुढाऱ्यांवर टीका करताना अजित पवार यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले होते, “पुढाऱ्यांच्या घरातील लोक रस्त्यांची टेंडर घेतात आणि कामे चांगली करत नाहीत. त्यामुळे एकतर कॉन्ट्रॅक्टर बना, नाहीतर पुढारी बना.” नेत्यांच्या मागे फिरण्यापेक्षा जनतेसाठी वेळ देण्याचा अप्रत्यक्ष सल्ला त्यांनी आपल्या पक्षातील भाऊगर्दीवाल्या पदाधिकाऱ्यांना दिला होता आणि हेच त्यांच्या स्पष्टवक्तेपणाचा परिचय देते. कचऱ्याच्या विषयावर बोलताना त्यांनी कार्यकर्त्यांचे कान पिळले होते. शालांमधील कागद खिशात न ठेवता कचरा पेटीत टाका, कचऱ्यापासून वीज, केमिकल, खत तयार करता येते, असे सांगत उल्हास नदीतील अतिक्रमणावर त्यांनी तीव्र खेद व्यक्त केला होता. बदलापूर शहराची लोकसंख्या पाच लाखांच्या पुढे गेली असून मुरबाडही वेगाने वाढत असल्याचे त्यांनी नमूद केले होते. मात्र तरुणांनी व्यसनांपासून दूर राहावे, असे खडेबोलही त्यांनी सुनावले होते. अतिवृष्टीबाबत मुख्यमंत्र्यांसोबत बैठकीचे नियोजन असल्याचे सांगून, जुलै-ऑगस्टमधील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना २२ कोटी रुपयांची मदत देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली होती. तसेच बारवी धरणासाठी ३२ कोटी रुपये दिल्याचा उल्लेखही त्यांनी केला होता. अहिंसावादी महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांना अभिवादन करून उपस्थितांना विजयादशमी व धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या शुभेच्छा त्यांनी दिल्या होत्या. नवीन राष्ट्रवादी कार्यालयात येणाऱ्या नागरिकांची कामे तात्काळ करा, हेलपाटे मारायला लावू नका, योजनांची माहिती घेऊन जास्तीत जास्त लोकांना लाभ मिळवून द्या, असा स्पष्ट गृहपाठ त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना दिला होता.
आज दादांचे ते शब्द, ती स्पष्ट भूमिका आणि तो अनुभव मुरबाडच्या इतिहासात कायमचा कोरला गेला आहे. पदे येतात-जातात, पण माणुसकी, कामाचा दर्जा आणि जनतेशी असलेले नाते टिकले पाहिजे; हा संदेश देणारे दादांचे मुरबाडमधील ते शेवटचे शब्द मुरबाडकरांच्या स्मरणात कायमचे कोरले गेले असून ते कधीही विसरता येणार नाहीत….










0 Comments