रेल सूचना : पुढील स्थानक लोकसभा २०२४ मुरबाड
२०१९ ला मुरबाडच्या रेल्वे स्थानकावर रेल्वेची वाट पाहत बसलेल्या मुरबाडकरांची स्वप्नपूर्ती होते ना होते; तोच पुन्हा, मुरबाडला येणारी रेल्वे या लोकसभा पंचवार्षिकला देखील रद्द करण्यात आल्याची जोरदार अलौन्समेंट झाली. मात्र आगामी लोकसभा २०२४ च्या निमित्ताने पुन्हा मुरबाडकरांची आशावादी पाऊले मुरबाडच्या अदृश्य रेल स्थानकाकडे वळविण्यात केंद्रीय मंत्री ना. कपिल पाटील (Cabinet Minister Kapil Patil) यांना यश आल्याचे म्हणावे लागेल.
लोकसभा निवडणुकीत कपिल पाटील (Kapil Patil) यांना मुरबाडमधून भरघोस मते मिळाली. राजकीय चातुर्याने रेल्वेचा मुद्दा पुढे करत त्यांनी दोन टर्म पूर्ण केल्या. मात्र आता तिसऱ्यां फेरीत पुन्हा तोच प्रयत्न सुरू असल्याचे दिसून येत आहे.
लोकसभेची निवडणूक (Lok Sabha Election) आणि मुरबाड रेल्वेचा (Murbad Railway) नातं तसं जुनाच समीकरण आहे. त्यामुळे लोकसभा निवडणूक आली की मुरबाडमध्ये रेल्वेचा मुद्दा आपसूकच डोके वर काढतो. आगामी निवडणुकीत आपला राजकीय हेतू साध्य करण्यासाठी रेल्वे नावाचा मृगजळ गुलाल वर्षभर आधी तालुकाभर उधळायला सुरुवात केली जाते. मात्र यावेळी तर मुरबाडला रेल्वे येणार, याचा कृत्रिम आनंद ही साजरा केला. शिवाय नेटकऱ्यांनी सोशियल मीडियावर यास भरघोस प्रसिद्धी ही दिली. यातून मुरबाडवासीयांच्या किती तीव्र भावना रेल्वे प्रकल्पाशी जोडल्या आहेत, याची अनुभूती येते.
![]() |
| ३ मार्च २०१९ रोजीचा रेल्वे भूमिपूजन |
जातीपातीच्या राजकारणाचा शाप लागलेल्या मुरबाड तालुक्यातील अनेक खेडोपाडी आजही मुख्य प्रवाहा पासून कोसो दूर आहेत. अनेक गावपाड्यांमध्ये रस्ते, विज व पाणी सारख्या मूलभूत बाबींचा वानवा आहे. त्यात अनियोजित प्रशासन, भ्रष्टाचाराची वाळवी, स्वार्थी राजकारणी आदींनी मुरबाडचा विकास रोखला आहे.
खऱ्या अर्थी रेल्वे ही मुरबाड तालुक्यासाठी लाईफलाईन ठरणार, रेल्वेमुळे ठाणे जिल्ह्यातील मुरबाड सारखा दुर्गम, ग्रामीण तथा विकसनशील तालुका मुंबई सारख्या महानगराला जोडला जाणार. यातून मुरबाडच्या विकासाला नवीन दिशा प्राप्त होईल, यात दुमत नाही. त्यामुळे मुरबाड रेल्वे हा समस्त मुरबाडकरांच्या अस्मितेचा व जिव्हाळ्याचा प्रश्न असतांना त्याचा पद्धतशीरपणे राजकीय भांडवल केला आहे. खऱ्यार्थी उद्घाटने, बॅनरबाजी या सर्व सोवळे-ओवळे यांना लोक कंटाळलेत. त्यांना वस्तुस्थितीची अपेक्षा आहे.
रेल्वेची पत्रकार परिषद
याबाबत रीतसर माहिती वाटण्यासाठी ठाणे जिल्ह्यातील मुरबाडचे पंचायतराज केंद्रीय राज्यमंत्री कपील पाटील (Cabinet Minister Kapil Patil) यांनी ५ फेब्रुवारी रोजी मुरबाडमध्ये पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी त्यांनी हातात आणलेले दस्तऐवज वाचून ही दाखविले. ठाणे जिल्ह्याला ठेकेदारीचा शाप असल्याचे ना. पाटील यांनी आपसूकच मान्य केले, तेव्हा रेल्वेच्या कामासाठी योग्य ठेकेदार मिळवा अशी प्रार्थना करीत असल्याचे त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. मुरबाडला रेल्वे मंजुरी, या औत्सुकते पोटी पत्रकारांनी विचारलेल्या अनेक प्रश्नांची साहेबांनी दिशाच फिरवली. तर काही प्रश्नांवर संताप ही व्यक्त केला. दरम्यान साहेबांचा हशा पिकविण्याचा प्रयोग काही अंशी यशस्वी ठरल्याचं म्हणावं लागेल. त्यामुळे मुरबाडकरांच्या मनातील प्रश्नांची समाधानकारक उत्तरे पत्रकारांच्या पदरी पडली नाही. शिवाय केंद्रीय मंत्री साहेबांच्या याही पत्रकार परिषदेत (Press Conference) कार्यकर्त्यांचा गोंधळ सर्वाधिक पाहायला मिळाला. त्यामुळे नेमकी पत्रकार परिषद होती की कार्यकर्ता मेळावा? हा संभ्रम निर्माण झाला.
रेल्वे, आंबिवली वरून ५ स्थानके घेत मुरबाडला पोहचणार. नंतर कुठे जाणार माहीत नाही? ही नगर पर्यंत गेली पाहिजे अशी केंद्रीय मंत्री यांची जरी इच्छा असली तरी सद्यस्थितीला ती निदान मुरबाडला तरी येईल का? हा प्रश्न मुरबाडकरांचा आहे. रेल्वेला प्राथमिक मंजुरी मिळाल्याच्या कागदांचा जाडा बंच जरी आपल्याकडे असला तरी ती प्रत्यक्षात मात्र कागदावरून भूपृष्ठावर केव्हा धावेल? यावर चर्चा होणे अपेक्षित आहे. मुरबाडला रेल्वे फेऱ्यांचे स्वरूप, भूसंपादन, कालावधी याबाबत विचारणा केल्यावर केंद्रीय मंत्री यांची संतप्त प्रतिक्रिया अपेक्षित नाही. सबब यास मुरबाड वासीयांच्या भावनांचा अनादर म्हणावा लागेल?
एकंदर यंदाच्या निवडणूकीत पुन्हा रेल्वेचा शिक्का चालेल असा वातावरण दिसत असून निवडणूकीचा प्रश्न मार्गी लागेल असे दिसते. या सर्वांतून येती लोकसभा निवडणूक निभावून जाईल आणि बाकी पुढचं पुढे; अर्थातच पुन्हा मुरबाड रेल्वे झिंदाबाद. मात्र रेल्वेचं स्वप्न उराशी घेऊन बसलेली मुरबाडची साधीभोळी जनता नेहमीप्रमाणे या आमिषाला कितपत बळी पडेल? हे पाहणे निश्चितपणे चिंतेचे आहे.
- [ किशोर गायकवाड मुरबाड ]
_________________________________________
वाचा...







0 Comments