भातपिकांच्या नुकसानभरपाईसाठी कुणबीसेनेची तहसिल कार्यालयावर धडक... Kishor K Gaikwad - Shabd Mashal


भातपिकांच्या नुकसानभरपाईसाठी कुणबीसेनेची तहसिल कार्यालयावर धडक...

विश्वनाथ पाटलांचा तहसीलवर धरणे!

[ KISHOR K. GAIKWAD ]
मुरबाड : (दि. २३) तालुक्यातील शेतकऱ्यांच्या झालेल्या भातपिकांच्या नुकसानभरपाईसाठी आज कुणबीसेनेने मुरबाड तहसिलदार कार्यालयावर मोर्चा आयोजित केला होता.

  कुणबी सेनेचे प्रमुख विश्वनाथ पाटील यांच्या नेतृत्वाखाली या मोर्चाचे आयोजन करण्यात आले तर या संपूर्ण मोर्चाचे नियोजन कुणबी सेनेचे तालुका अध्यक्ष गुरुनाथ एगडे यांनी केले. याप्रसंगी मोठ्या संख्येने बाधित शेतकरी व कार्यकर्ते उपस्थित होते.
   
  शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे न करता सरसकट एकरी पंचवीस हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी, कर्जमाफीचे जाचक नियम रद्द करून शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती द्यावी, शेतीविषयक शासनाचे चुकीचे धोरण व निसर्गाचा कोप यामुळे डबघाईस आलेला भात उत्पादनक व्यवसायाला आधार देण्यासाठी रोजगार हमीतून शासनाने शेती लावून द्यावी, भात खरेदी केंद्र त्वरित सुरू करून क्विंटलमागे चार हजार पाचशे रुपये दर दद्यावा, हायकोर्टाच्या निर्णयानुसार गरीब शेतकऱ्यांच्या सातबारावर टाकलेल्या ३५ सेक्शन व वनसंज्ञेच्या नोंदी रद्द कराव्यात, ठाणे पालघर जिल्ह्यांतून मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या प्रत्येक धरणातून ५०% वाटा दोन्ही जिल्ह्यांच्या सिंचन व्यवस्थेसाठी द्यावा, अशा विविध मागण्यांचे पत्र यावेळी मुरबाडचे निवासी नायब तहसीलदार यांना देण्यात आले. 
 
  सुरुवातीला शांततेने सुरू असलेल्या मोर्चाला तहसीलदारांची उपस्थित होत नसल्याने विश्वनाथ पाटील यांनी तहसीलदार कार्यालयाच्या दारासमोर ठिय्या मांडून आक्रमक आंदोलन करण्याचा इशारा देताच निवासी तहसिलदार यांनी सन्मानपूर्वक मोर्चेकऱ्यांना तहसिल दालनात नेऊन निवेदन स्वीकारले व आपल्या मागण्या शासन दरबारी मांडणार असल्याचे आश्वासन दिल्याने मोर्चाची सांगता करण्यात आली. तसेच सदर मागण्यांचा वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा केला जाऊन शेतकऱ्यांना न्याय मिळेपर्यंत कुणबी सेना लढत राहील, असा विश्वास विश्वनाथ पाटील व तालुका अध्यक्ष गुरुनाथ एगडे यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या न्यायहक्कांसाठी लढणाऱ्या कुणबी सेनेचा तालुक्यात जनाधार वाढत असून त्यांच्या कार्याला शुभेच्छा व्यक्त केल्या जात आहेत.

किशोर गायकवाड )
___________________________________________



पत्ता : अंजनी गॅस सर्व्हिसच्या बाजूला, मेन रोड, मुरबाडसंपर्क : ८८०५०८३९४३

(शब्द मशालच्या कोणत्याही बातमीमध्ये काही त्रुटी, सूचना, दुरुस्ती अथवा मार्गदर्शन असेल तर वाचकांनी कृपया खालील कमेंट बॉक्समध्ये कळवावे ही विनंती)

0 Comments