हर्षुभाऊ... मुरबाडचे एक उमदे व्यक्तिमत्त्व हरपले..!
मध्यरात्रीची सुमारे दीड वाजेची घटका असावी... दिनांक २५ ऑगस्टचा दिवस सुरू झाला होता. रात्रीच्या निरव वातावरणाचा भंग करत वाजत असलेला फोन मी त्वरित उचलून कानाला लावला अन् पायाखालची जमीनच जणू सरकली... "दादा काका आम्हाला सोडून गेले" ...या आर्त सुरानंतर अनिकेतने दाबून धरलेला हुंदका सोडला... "रडू नकोस, धीर धर मी आलो" एवढं शब्द तोंडून निघाले आणि फोन ठेवून मी अवघ्या काही मिनिटांत नागाचा खडक गाठला. काही मोजकी मंडळी हर्षुभाऊंच्या दारात उभी होती. विश्वास ठेवणे अवघड जात होतं, हर्षुभाऊ आपल्यात राहिले नाही... परिसरात याबाबत अद्याप काही कळाले नव्हते. मात्र काही क्षणातच ही वार्ता वाऱ्यासारखी पसरली अन् त्या मध्यरात्री अवघा नागाचा खडक परीसर खडबडून जागा झाला. गणेशोत्सवाच्या धावपळीमुळे थकून झोपलेली ही मंडळी आता झोप गमावून गर्दी करू लागली होती. काही समजणे ना... जो तो आश्चर्य व्यक्त करत होता.
भाऊंची तब्बेत गेल्या दोन दिवसांपासून खालावली होती. त्यामुळे मित्र मंडळींचा सतत राबता सुरू होता. शिवाय शेजारीपाजारी आपुलकीने भाऊंची विचारपूस करण्यासाठी येत होती. काल नेहमीप्रमाणे भाऊंनी जेवण घेतले आणि निवांत अंग टाकले होते. मात्र काही तासाभरात त्यांना त्रास वाढत असल्या सारखे जाणवू लागल्याने कुटुंबियांनी त्यांना उपचारासाठी कल्याणला हलविले. याच दरम्यान काळाने असा घाव घातला आणि होत्याचे नव्हते झाले. कोण्या हृदयविकाराने हर्षुभाऊंना आपल्यापासून हिरावून नेले...
अत्यंत संघर्षमय परिस्थितीतून हर्षुभाऊंनी आपल्या संसाराचा रथ येथवर आणला होता. आपल्या व्यस्त जीवनात ही मित्रांसाठी त्यांचा वेळ राखीव ठेवत. दिवसभराची कामे लवकर आटोपली की संध्याकाळी ते बाजारपेठेत आवर्जून फेरफटका मारत. यावेळी नजरेस पडणाऱ्या आपल्या मित्रमंडळींचे ते आपुलकीने विचारपूस करीत. मात्र हा चेहरा आता पुन्हा दिसणार नाही, ही गोष्ट खरंच मनाला अस्वस्थ करत आहेत.
तरुणाईला लाजवेल असा शरीराचा बांधा, प्रशस्त राहणीमान, नेहमी स्वच्छ व नीटनेटका पेहराव केलेला व सर्वात महत्त्वाचे म्हणजे चेहऱ्यावरील प्रफुल्लित हास्य आणि तेज ही त्यांची खरी ओळख मात्र कायम लक्षात राहील...
हर्षुभाऊंच्या पश्चात त्यांची पत्नी, विवाहित मुलगी, मुलगा, धाकला भाऊ जयदीप अढाईगे व त्यांचा कुटुंब असा परिवार आहे... भाऊ तुम्ही जरी आमच्यापासून दूर गेले असाल.. मात्र तुमच्या आठवणी कायम आमच्या सोबत राहतील...
अशा सदैव स्मरणीय व्यक्तिमत्त्वाला भावपूर्ण आदरांजली...
💐💐💐💐💐💐💐💐
-शब्द मशाल परिवार
वाचा: हिरव्या रंगाची झाडी घनदाट... सांगा मित्रहो दिसतो कसा सिद्धगडचा थाट..? - [ SIDDHAGAD - KISHOR K. GAIKWAD ]
[ आमच्या फेसबुक पेजला झटपट भेट देण्यासाठी येथे क्लिक करा ]
![]() |
| Creative Science Hub - Murbad |


0 Comments