ठाणे (दि. १३) : कोरोनाच्या या महामारीने अनेक कुटुंबांना उध्वस्त केले आहे. सामान्य नागरिकांसह अनेक डॉक्टर्स, पोलिस या कोरोनाच्या कचाट्यात सापडले आहेत. मुरबाड तालुक्यातील अशाच एका कर्तव्य बजावणाऱ्या योद्ध्याने आज जगाचा निरोप घेतल्याची दुःखद घटना घडली आहे.
मुरबाड तालुक्यातील आंबेगाव येथे राहणारे ३६ वर्षीय पोलिस कर्मचारी जितेंद्र भालेराव यांचे आज निधन झाले आहे. जितेंद्र भालेराव हे वसई येथे वालीव पोलिस स्टेशनमध्ये पोलिस नाईक पदावर कार्यरत होते. शारीरिक त्रास जाणवू लागल्याने दिनांक १९ जून पासून नालासोपारा येथील रिद्धी विनायक या खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. दरम्यान त्यांचे कोरोना टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याचे बोलले जात असून त्यांच्या शरीरातील काही अवयव ही कमजोर झाल्याचे सांगितले जात आहे. मृत्यूशी संघर्ष सुरू असतांना आज पहाटे अडीच वाजेच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मावळली. त्यांचा दहन विधी आदरयुक्त रित्या तेथेच करण्यात आल्याचे समजते.
आपला बळकट शरीर ही मुरबाड तालुक्यात त्यांची विशेष ओळख मानली जाते. त्यामुळे तालुक्यातील तरुण वर्गामध्ये त्यांच्याबाबत विशेष आकर्षण होते. तसेच त्यांच्या प्रेमळ व नातेजोपासू स्वभावामुळे मुरबाड तालुक्यातील विविध सामाजिक, राजकीय क्षेत्रातील मंडळींमध्ये ते परिचित होते. मात्र त्यांच्या अशा अनपेक्षितपणे जाण्याने मुरबाड तालुक्यात शोककळा पसरली असून सोशियल मीडियाद्वारे त्यांच्यावर श्रद्धांजली वाहिली जात आहे. त्यांच्या पश्चात त्यांचे मोठे बंधू, आई, पत्नी व ५ वर्षीय चिमुकला, असा परिवार आहे.
[ आमच्या फेसबुक पेजला झटपट भेट देण्यासाठी येथे क्लिक करा ]
[टिळक स्कॉलर्स अकॅडमी व्हाट्सएप क्रमांक - ९८९५७३८६८१]
(शब्द मशालच्या सदर बातमीमध्ये अथवा कोणत्याही बातमीमध्ये काही त्रुटी, सूचना, दुरुस्ती अथवा मार्गदर्शन असेल तर वाचकांनी कृपया खालील कमेंट बॉक्समध्ये कळवावे ही विनंती)

0 Comments