तहान..! - किशोर गायकवाड



Shabd Mashal - Kishor Gaikwad



माणूस
 काय आणि प्राणी काय..? शेवटी तहानच ती! भेदभाव तिच्या तत्वात नव्हेच! पाण्याला फक्त तुमच्या तहानेशी कर्तव्य असते. तुमचं रंग, रूप, लिंग, आकार याच्याशी त्याचा व्यवहार नसतोच. हे मूक प्राणी बराच वेळ या बॉटलशी खेळत होते. मुळात त्यांचा उद्देश तो नव्हताच. त्यातील पाण्याला त्यांच्या तहानेने ओळखले होते. आपण ज्यास बॉटल म्हणतो, त्या प्लास्टिकच्या आवरणाने त्या पाण्याला बंदिस्त केले होते. त्याला बाहेर आणण्यासाठी त्याचे झाकण उघडणे अनिवार्य होते. मात्र हे त्या बिचाऱ्या मुक्यांना कसे ठाऊक असणार?
  

  बराच वेळ हा संघर्ष सुरू होता. माझ्यासोबत आणखीन एक सज्जन त्यांना न्याहाळत होता. पाण्यासाठी त्यांची तळमळ त्याने ओळखली, त्यामुळे न राहवल्याने त्यांच्या मदतीसाठी तो पुढे सरसावला. झाकणाचं बंधन मुक्त करून पाणी आणि त्यांचा मिलाप घडवून आणला. पाण्याचे दोन-दोन घोट सर्वांच्या कंठातून तृष्णेकडे गेले. समाधानाची ऊर्जा त्यांच्या बागडण्यातून जाणवली. 

  Shabd Mashal - Kishor Gaikwad  




खऱ्यार्थी यात मांडण्या सारखे काही नव्हेच, पण तहान आणि सजीव यांचं नातं, यातून मला प्रतीत झालेले भाव; शिवाय प्राणी मात्रांना किती समज असते? पुन्हा एकदा याची प्रचिती ही आली. यांचा संघर्ष होता फक्त तहानेशी, पर्यायाने जीवनाशी; मात्र मानवाचा संघर्ष... एका नजरेतून पाहिले तर... स्वार्थासाठी..? जातीधर्मासाठी..? पैशासाठी..?... ज्याच्यासाठी मनुष्य धावतोय, त्या संपदेचा खरा मालक निसर्ग आहे. तेव्हा कमाईमध्ये कळत न कळत या निसर्गाचे कर्ज ही जोडले जाते. अन् अखेरीस जगाचा निरोप घेतांना लालसेने कमवलेलं सर्व काही प्रामाणिकपणे इथेच ठेवून जावे लागते!
म्हणून...

हव्यासाने कमवलेला,
तो ओझा झाला ऋणाचा,
कळेल तुला थांबल्यावर;
हा ऐवज होता कुणाचा!

बस कर हा स्वार्थपणा,
थांबव तुझ्या शर्यतीचा गाडा;
निसर्गाच्या या निवाऱ्याचा,
चुकलाय इथे कुणाला भाडा?

जगविण्यासाठी जग तू,
आयुष्य तुला छान आहे;
सुकेल्या गळ्याला घोटभर पाणी,
हीच ओठावरची तहान आहे!
    

 -किशोर गायकवाड

0 Comments