"आई, खूप भूक लागले गं"
"हो बाळ, थोडं पुढे गेलं का, माणसे भेटतील, तेव्हा ते आपल्याला पाहून नक्कीच घास भरवतील!"
"ये आई, माणसे इतकी दयाळू असतात?"
"हो, बघ ते समोरून आलेले हात माणसाचे आहे, !"
"काय आहे गं हे? कसं लागतं चवीला?"
"बाळ, याला अननस म्हणतात, गोड असतं चवीला"
"आपण खाऊ शकतो हे?
"हो, ज्या हातांनी हे दिले, ती माणसं होती, म्हणजे आपण खाऊ शकतो की;"
"आहह..!"
"काय झालं आई, का आक्रोश करतेस? सांगा ना? काय होतंय?"
"काही नाही बाळ, थोडं पाण्याकडे जाऊ, बरं वाटेल"
"आई, घात का झाला आपला? सांग ना?"
आई- ....
"सांग ना आई? आपण मरू आता? पण तू तर म्हणालीस की माणूस दयाळू असतो, आपल्यावर जीवापाड प्रेम करतो, आपण त्यांच्यावर विश्वास ठेऊ शकतो?... सांग ना गं आई... आई... ये आई..."
आई-... ... ...
-बर झालं मानवा, तुझ्या या काळकुट्ट दुनियेत नाही आलो. आकार उकार नाही पाहिला तुझ्या या क्रूर दुनियेचा...
माणसा जग रे तू खुशाल, खुशाल नावे करून घे हे पर्यावरण तुझ्या.. सांभाळ तूझी संपदा... ठेव तुलाच हे विश्व... जग एकटाच... अभिमान असेल तुला, कोणता ही पुरावा शिल्लक नाही, की नाही आरोप आणि दोन खून मार्गी लागले? तेव्हा अजून खून करण्याच्या तय्यारीत असशील ना?
'खरंच... आज पर्यंत मी समजत होतो, दोनच जाती माणसाच्या... नर आणि मादी! आज आणखीन एक जात कळाली- विकृती; पुन्हा म्हणू नका हरामखोरांनो कोरोना कसा येतो..? चक्रीवादळ कसा येतो..? निसर्गाचा कोप कसा होतो..?'
अरे चेहरा कोणता होता?
कोणते ते हात होते?
भुकेसाठी विस्तव चघळणारे;
दोन जीवांचे ते दात होते!
जीवनाचा संघर्ष संपला,
तेव्हा गर्दी झाली अनावरांची;
खून झाला माणुसकीचा,
अन् प्रेतं भेटली जनावरांची!
विष भरविणाऱ्या हातांना,
कंप कसे सुटले नाही?
कुशीत झोपलेले बाळ माझे,
पुन्हा कधी उठलेच नाही!!
पुन्हा कधी उठलेच नाही!!
-किशोर गायकवाड
1 Comments
खून या शिर्षकाखाली अत्यंत मार्मिक व उत्तम प्रकारे भावना व्यक्त केल्या आहेत.go ahead!
ReplyDelete