शस्र की शास्त्र?
महापुरुषांचे जयंती महोत्सव अर्थात एकोप्याचे प्रतीक! हाच तळमळीचा उद्देश बाळगून आपल्या आदर्शांनी जयंती महोत्सव उदयास आणले. मात्र आजची स्पर्धा पाहता नक्कीच त्यांचा कार्याचा बाजार मांडला जात आहे, असे म्हणणे गैर ठरणार नाही.
हल्लीचे जयंती महोत्सव म्हणजे निव्वळ स्पर्धाच; त्यात विभागलेले गट-तट, श्रेयवादाच्या लढाया, या सर्वात आजचा तरुण निष्कारण भरडला जातोय. जयंतीच्या नावे पैसा गोळा करायचा अन् अनाठायी खर्च करायचा, हाच पायंडा सुरू आहे. या पैशातून शेतकरी, गरजू, विद्यार्थी यांचे भवितव्य घडविता येऊ शकतो, वाचनालयांची उभारणी अथवा रुग्णसेवा करिता तरतूद करता येऊ शकते हा विचार कोणी करणे महत्त्वाचे समजत नाही. अवघ्या काही दिवसांवर महामानवाची जयंती येत आहे. यावेळी त्यांचे अनुयायी मोठ्या उत्साहाने तय्यारीला लागतात. मात्र आजही खरचं महामानवाच्या विचारांची जयंती साजरी होते का? त्यांच्या स्वप्नातील तरुण घडतोय का?
नुकताच झालेल्या महाराजांच्या जयंती महोत्सवाला अक्षरशः मिशरूड देखील नसणाऱ्या तरुणांच्या हातात चक्क तलवारी? आणि मग हेच फोटोस् सोशियल मिडियावर लाईक्स आणि कमेंट्सच्या प्रतीक्षेत असतांना नजरेस पडतात. मुळात अपेक्षा अशी की, जेव्हा या तरुणांच्या हातात तलवारीं ऐवजी पुस्तके येण्यास सुरुवात होईल, तेव्हा खऱ्या अर्थी आपल्या राष्ट्रपुरुष्यांना आदरांजली वाहिली जाईल!
अरे स्वयंघोषित मावळ्यांनो, ढाली-तलवारीचा युग केव्हाच मावळला; तेव्हा झपाट्याने बदलणाऱ्या विज्ञान युगात शिक्षणाची कास धरून प्रवाहा सोबत ज्ञानाला स्वीकारणे अनिवार्य आहे. तलवार हे हिंसेच्या भावनेला खतपाणी घालण्याचं प्रतिक तर पुस्तके ही प्रगतीचा, विकासाचा मार्ग!
मावळ्यांनो, आता स्पर्धा, लढाई शस्राची नव्हे तर शास्राची सुरू असून यशाची वेस गाठण्यासाठी कराव्या लागणाऱ्या शैक्षणिक संघर्षाच्या पूर्वकल्पनेची जाणीव बाळगून पुढील पिढीला घडविणे आवश्यक झाले आहे.
आजचा तरुण कोण्या राजकीय पक्ष, संघटनेचा अध्यक्ष होण्यात, पुढाऱ्यांच्या हुजरेगिरी करण्यात धन्यता मानतो. तुकोबा, शिवराय, फुले, शाहू, आंबेडकरांच्या स्वप्नातील महाराष्ट्र मात्र आजही आमच्या तरुणांना उमजला नाही. तरुणांच्या हाताला रोजगार देण्याबाबत उपाययोजना आखाव्यात अशी अपेक्षा या नेत्यांकडून आहे. मात्र आपले नेते झालेत अभिनेते आणि अभिनेते झालेत नेते. बेरोजगार तरुणांची माथी भडकविण्यात त्यांना अधिक धन्यता वाटते.
देशात सुशिक्षित बेरोजगारांचा आकडा वाढत आहे. तरुण पिढी व्यसनाच्या आहारी जात आहे. इंटरनेट, मोबाईल फोनने तरुणांना जणू वशमध्ये केलेय, युवाशक्तीचा राजकीय पुढारी आपल्या स्वार्थासाठी गैरवापर करीत आहेत, धूर्त राजकारणाच्या जात्यात आजचा तरुण भरडला जात आहे. या सर्व बाबींना जबाबदार कोण?
कोट्यवधींचा निधी खर्ची लागलेल्या रस्त्यांवर मलमपट्टी-ड्रेसिंग केलेली नजरेस पडते. या भ्रष्टाचाराला जबाबदार कोण? आधीच शेतकऱ्यांना परिस्थितीने मारले आणि त्यात सरकारने झोडपले; पीक विमा, कर्ज माफी, शेतकीच्या योजना यातून शेतकऱ्यांच्या होत असलेल्या थट्टा तसेच वाढती शैक्षणिक बाजारपेठ, अशा विविध मुद्द्यांवर आजच्या तरुणांनी संघटन करून लढणे गरजेचे आहे. देशाच्या प्रगतीची धुरा तरुणांनी हातात घेऊन देशाला प्रगतीच्या मार्गाकडे नेले पाहिजे, हीच सर्व महापुरुषांना खरी आदरांजली ठरेल!
- किशोर गायकवाड

2 Comments
Nice
ReplyDeleteThank you
ReplyDelete