
दिलासादायक : मुरबाडकरांची आता घरबसल्या होणार मोफत आरोग्य तपासणी..!|Murbadkars will now get free body check up at home..
[ KISHOR K. GAIKWAD ]
मुरबाड : (दि. १५) आजपासून संपूर्ण महाराष्ट्रात सुरू झालेल्या 'माझे कुटुंब, माझी जबाबदारी' या मोहिमेला मुरबाड शहरात राबविण्यासाठी नगर पंचायतने कंबर कसली असून नागरिकांना आता घरबसल्या याचा फायदा होणार आहे.
गेल्या काही दिवसांपासून मुरबाड शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढला आहे. त्यामुळे कुटुंबातील प्रत्येक सदस्याची प्राथमिक आरोग्य चाचणी होणे आवश्यक असतांना या सर्व बाबी काही प्रमाणात जोखीमदार आणि खर्चिक असल्याने नागरिकांना या मोहिमेमुळे दिलासा मिळणार आहे.

नगर पंचायत कर्मचारी, पंचायत समिती कर्मचारी, आशा वर्कर्स आणि अंगणवाडी सेविका या कर्मचाऱ्यांच्या मार्फत पथके तयार करून मुरबाड शहरात घरोघरी जाऊन नागरिकांची ऑक्सिजन आणि शारीरिक तापमान व इतर प्राथमिक तपासणी करणार असल्याचे नगर पंचायतचे मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांनी सांगितले. मात्र या प्राथमिक तपासणी दरम्यान एखादा नागरिक आजारी असल्याचे आढळून आल्यास त्यास संबंधित आरोग्य सेवेकडे उपचारासाठी रवाना करण्या बाबत मार्गदर्शन तथा सहकार्य करणार असल्याचे ही सांगण्यात आले.
या मोहिमेच्या पहिल्या टप्प्याला आजपासून सुरुवात झाली असून दिनांक १० ऑक्टोबर रोजी तो समाप्त होऊन दिनांक १४ ऑक्टोबर ते २४ ऑक्टोबर दरम्यान दुसरा टप्पा राबविण्यात येणार आहे.
नागरिकांची तपासणी करतांना सर्व कर्मचाऱ्यांनी कोणत्याही परिस्थितीत मास्क काढू नये, हॅन्डग्लोस आणि सॅनिटायजचा वापर करावा, काही अडचण भासल्यास प्रमुखांशी संपर्क साधावा अशा सूचना नागरिकांची तपासणी करणाऱ्या संबंधित कर्मचाऱ्यांना देण्यात आल्या असून नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे व आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी, असे आवाहन नगर पंचायत तर्फे मुख्याधिकारी कंकाळ यांनी केले आहे.

(किशोर गायकवाड)
______________________________________________



0 Comments