मुरबाड | फॉरेस्ट अलर्ट : शेतकऱ्यावर बिबट्याचा हल्ला?|A leopard attack on a farmer?
[ KISHOR K. GAIKWAD ]
मुरबाड : (दि. २०) तालुक्यातील आंबेळे - साखरे हद्दीत एका शेतकऱ्यावर बिबट्या सदृश वन्यहिंस्र श्वापदाने काल रात्री साडेदहाच्या सुमारास हल्ला करून जखमी केल्याची घटना घडल्याने परिसरातील गावांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे.
मुरबाड तालुक्यातील राष्ट्रीय महामार्गा ६१ वरील आंबेळे (गडगे) गावावरून धारगाव सारखे गावाकडे जाणाऱ्या रस्त्या दरम्यान असणाऱ्या एका फार्महाऊसच्या गेट समोर ही घटना घडली आहे. काल रात्री साडेदहाच्या सुमारास नागो माळी (५०) या शेतकऱ्यावर दबा धरून बसलेल्या एका वन्यहिंस्र श्वापदाने पाठीमागून हल्ला केला असून हा श्वापद बिबट्या असल्याचे बोलले जात आहे. यात शेतकरी माळी जखमी झाले असून त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले आहे. गावकऱ्यांनी या घटनेबाबत वन विभागाला माहिती दिली असता वनरक्षक अल्पना घोलप, गणेश रावते, वैजनाथ फड, ज्ञानेश्वर मुकुळ यांनी तात्काळ घटनास्थळी हजेरी लावून परिसराची पाहणी केली. तसेच गावकऱ्यांनी रानात जाऊ नये, रात्री विनाकारण एकटे फिरू नये, जनावरे, वृद्ध व लहानमुलांची विशेष काळजी घ्यावी, एखादा संशयित वन्य हिंस्र प्राणी आढळून आल्यास मोठमोठ्याने आवाज करून, गोंगाट घालून त्याला लोकवस्तीपासून दूर पळवावे व याबाबत वन विभागाला तात्काळ कळवावे, अशा विविध सूचना केल्या व अन्य खबरदारीच्या उपाययोजना ही समजावून सांगितल्या आहेत. याबाबत स्थळ पंचनामा करण्यात आला असून मध्यरात्री पर्यंत वन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी उपस्थित होते.
गेल्या चार दिवसांपासून सदर भागात या हिंस्र श्वापदाचा वावर असल्याचे ग्रामस्थांकडून सांगण्यात येत आहे. ज्या ठिकाणी बिबट्याचा वावर असतो तेथे त्याने शिकार केल्याची खात्रीशीर संभावना असल्याने येथील वन्य परिसरात वन विभागाकडून शोध मोहीम सुरू झाली आहे. त्यानुषंगाने सदर वन परिसरात वन विभागाला एखादी मृत वन्य शिकार आढळून आल्यास तेथे सीसीटीव्ही कॅमेरे व पिंजरे बसविले जातील, असे वनक्षेत्रपाल यांनी सांगितले. तसेच जखमीला शासनाकडून योग्य ती भरपाई ही दिली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
"आढळून आलेले ठसे खूप छोटे आहेत. त्यामुळे ते बिबट्या ऐवजी तरसाचे असण्याची ही शक्यता आहे. मात्र तरी शक्यता नाकारता येत नसल्याने खबरदारी म्हणून वन विभागाचे कर्मचारी याठिकाणी तैनात करण्यात आले आहेत. नागरिकांना खबरदारीच्या उपाययोजनांबाबत सूचित करण्यात आले असून सद्यस्थितीला नागरिकांनी त्या सूचनांचे पालन करून अधिक काळजी घेणे आवश्यक आहे."
-विकास भामरे, परिक्षेत्र वन अधिकारी, मुरबाड (पूर्व)
(किशोर गायकवाड)
______________________________________________
0 Comments