मुरबाड : सोनारपाड्यातील 'त्या' बेपत्ता चिमुकलीचे काय झाले? | ( किशोर गायकवाड )




मुरबाड (दि. १३) : रविवार दि. १४ जून रोजी मुरबाड शहरातील सोनारपाडा येथून भर दुपारी एक पाच वर्षीय चिमुकली दारा समोरून बेपत्ता झाली होती. या घटनेला उद्या तब्बल एक महिना पूर्ण होत आहे. या प्रकरणी भारतीय दंड संहिता १८६० अन्वये कलम ३६३ अंतर्गत मुरबाड पोलीस स्टेशनमध्ये अपहरणाचा गुन्हा दाखल आहे. मात्र सदर मुलीचा शोध घेण्यास मुरबाडच्या पोलिस यंत्रणेला अद्याप काही यश आले नाही. त्यामुळे या बेपत्ता मुलीचे काय झाले? असा सवाल मुरबाडकर विचारत आहेत.

   पाच वर्षीय चिमुकल्या रियाचा अपराध एवढाच, की ती नेहमीप्रमाणे आपल्या दारा समोर खेळत होती. नेहमीच्या सवयीप्रमाणे तिच्या आईने तिला घराबाहेर येऊन साद घातली. मात्र यावेळी आईची साद ऐकायला रिया त्या अंगणातच नव्हती. रिया सोबत नेमकी काय हकीगत घडली? हे अद्यापही गुलदस्त्यात आहे. त्यामुळे आपल्या लहान लेकराबाळांसाठी मुरबाड तालुका आता सुरक्षित नसल्याचे उघड होत आहे. 

   दि. २५ जून पासून मुरबाड पोलीस स्टेशन कोरोनाच्या कचाट्यात सापडला. तेव्हा पासून त्यांच्या कर्मचारी वर्गाची वाताहत झाली. त्यामुळे या प्रकरणाला अधिक गती मिळाली नाही. मात्र सदर चिमुकली हरवल्याच्या सप्ताहात सोनारपाडा परिसरातील घरे, नाले, विहिरी, गल्लीबोळा यांच्यात कसून शोध घेण्यात आला होता. येथून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या म्हाडा वसाहतीतील पडीक घरे, मुरबाड एम. आय. डी. सी. मधील बंद कंपन्या यांना ही अनेकदा झडती घेण्यात आली आहे. तपासाचा वेग वाढविण्यासाठी पोलिसांच्या विशेष पथकास व डॉग स्कॉटला पाचारण करण्यात आले होते. घटनेच्या चहूभागातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा शोध घेऊन त्यातील फूटेज ताब्यात घेतले गेले. मात्र अद्यापही अपेक्षित यश हाती लागले नाही.

  देशात व पर्यायाने राज्यात गेल्या सुमारे चार महिन्यांपासून लॉकडाउन प्रक्रिया सुरू आहे. अशातच या परप्रांतीय कुटुंबातील ५ वर्षीय चिमुकली सोनारपाडा सारख्या गजबजलेल्या परिसरातून  दिवसाढवळ्या गायब होणे, आश्चर्याचे म्हणावे लागेल. मात्र या चिमुकलीचे नेमके झाले काय? आकाशने गिळले की जमिनीने? या प्रश्नाचे उत्तर मुरबाडकरांना अद्यापही मिळाले नाही.




Murbad
    [टिळक स्कॉलर्स अकॅडमी व्हाट्सएप क्रमांक - ९८९५७३८६८१]

(शब्द मशालच्या सदर बातमीमध्ये अथवा कोणत्याही बातमीमध्ये काही त्रुटी, सूचना, दुरुस्ती अथवा मार्गदर्शन असेल तर वाचकांनी कृपया खालील कमेंट बॉक्समध्ये कळवावे ही विनंती)


 



0 Comments