मुरबाड : (दि. १६) 'ती' काळी दुपार मुरबाड शहरातील सोनारपाडा रहिवासी कधीही विसरणार नाहीत. शहराच्या गजबजलेल्या या परिसरातून भर दुपारी अचानक लुप्त झालेली एक चिमुकली, आज तिसरा दिवस मावळून ही सापडली नसल्याने शहरात भीतीचे वातावरण निर्माण आहे.
रविवारी (दि. १४ रोजी) नेहमीप्रमाणे चिमुकली रिया घरासमोरील मोकळ्या परिसरात आपल्या इतर चिमुकल्या मैत्रिणीं सोबत खेळत होती. बराच वेळ होऊन ही रियाने घरात फेरफटका मारला नाही, तेव्हा आईने बाहेर येऊन तिला जेवण्यासाठी हाक घातली. परंतु अनेकदा आवज देऊन ही रियाची साद मिळत नसल्याने आईच्या चिंतेत वाढ झाली. त्यामुळे ती शेजारी चौकशी करू लागली. आता बराच वेळ उलटला, मात्र रिया काय सापडेना? आईचे डोळे पाण्याने भरून आले अन् चेहऱ्यावर भीतीचे भाव उमटले. परिसरातील लोक घरातून बाहेर आले. गर्दी जमली आणि नेमक्या विषयाबाबत चर्चा होऊ लागली. विषय तितकासा सोपा नसल्याचे सगळ्यांना जाणवले. पुन्हा एकदा रियाचा जातीने शोध सुरू झाला. रियाच्या वडिलांना फोन करून कामावरून बोलविण्यात आले. बघता बघता ही घटना वणव्यासारखी शहरात पसरली. तिवारी कुटुंबियांचे आणि शेजारीपाजाऱ्यांचे प्रयत्न अखेर हरले. त्यांनी सरळ मुरबाड पोलिसांत धाव घेतली.
घटनेचे गांभीर्य ओळखून मुरबाड पोलिसांनी भारतीय दंड संहिता १८६० अन्वये कलम ३६३ अंतर्गत गुन्हा दाखल करून तात्काळ आपल्या तपासला सुरुवात केली. परिसरातील घरे, नाले, गल्लीबोळाची झडती घेतली. हाकेच्या अंतरावर असणाऱ्या म्हाडा वसाहतीतील पडीक घरे, मुरबाड एम. आय. डी. सी. मधील बंद कंपन्या यांच्यात कसून शोध घेण्यात आला. तपासाचा वेग वाढविण्यासाठी पोलिसांच्या विशेष पथकास व डॉग स्कॉटला पाचारण करण्यात आले. घटनेच्या चहूभागातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा शोध घेऊन त्यातील फूटेज ताब्यात घेतले गेले. मात्र अद्यापही अपेक्षित यश हाती लागले नसल्याने अवघ्या सोनारपाडा परिसरात चिंतेचे वातावरण कायम आहे.
ज्यावेळी ही घटना घडली, दरम्यान एक क्रीम रंगाच्या चेक्सचा शर्ट व काळी पॅन्ट घातलेला व काळा मास्क लावलेला, मध्यम आकाराचा, हातात डेटॉलची बॉटल असलेला अनोळखी व्यक्ती सकाळी याच परिसरात नजरेस पडल्याचे शेजारील महिलेने सांगितले.
याबाबत कोणा नागरिकाला काही माहिती मिळाल्यास ती आमच्या पर्यंत पोहचविण्याचे आवाहन मुरबाड पोलिसांकडून करण्यात आले आहे. तशी माहीत मिळाल्यास त्यांनी 02524-222233/7021031972/9923039997 या क्रमांकांवर संपर्क साधावा.
अपहरण झालेल्या रियाचे वय पाच वर्षे असून वडील राकेश तिवारी हे मुरबाड एमआयडीसी मधील 'सिद्धेश्वर प्लास्टिक' या कारखान्यात कामाला आहेत. गेल्या २२ वर्षांपासून ते मुरबाडमध्ये रहिवासी आहेत. सन २००२ मध्ये शोभादेवी यांच्या सोबत त्यांचे लग्न झाले. त्यांनतर या दाम्पत्यांना पाच मुली झाल्या, पैकी मोठी मुलगी गावी असून शेवटची मुलगी रिया व अन्य तीन मुली त्यांच्या समवेत राहतात.
"भैया, कोई मुझे मेरी बच्ची लाकर दो" -त्या माऊलीची ती आर्त आरोळी, काळजाचा ठोका चुकविल्या शिवाय राहत नाही. एक क्षण ही आपल्या पासून दूर नसलेल्या चिमुलीला गेल्या दोन दिवसांपासून न पाहिल्याने या मातेची अवस्था पाहवत नाही. 'आमची रिया लवकरात लवकर सुखरूप घरी परतो,' अशी प्रार्थना या परिसरातील नागरिक करीत आहेत.
[ आमच्या फेसबुक पेजला झटपट भेट देण्यासाठी येथे क्लिक करा ]
0 Comments