देशातील शेतकऱ्यांसाठी मुरबाडचे राजकीय पक्ष एकवटले
देशव्यापी बंदला मुरबाडमध्ये उत्स्फूर्तपणे प्रतिसाद!
[ KISHOR K. GAIKWAD ]
मुरबाड: (दि. ८) केंद्र सरकारने पारित केलेल्या तीन कृषी कायद्यांं विरोधात शेतकरी, शेत मजुर व विविध शेतकरी संघटनांनी भारत बंद पुकारलेला असतांना त्यास पाठिंबा म्हणून मुरबाड तालुका-शहरातील सर्व नागरिक, व्यापारी व दुकानदारांकडून आज उत्स्फूर्तपणे बंद पुकारण्यात आला.
बंदकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज व विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून जय जवान, जय किसानच्या घोषणा देत मुरबाड तहसिलदार कार्यालया पर्यंत पायी मोर्चा काढला व महामहीम राष्ट्रपतींना मुरबाड तालुका तहसिलदार यांच्या मार्फत सदरचे काळे कायदे त्वरित मागे घेऊन शेतकऱ्यांना गुलामीकडे जाण्यापासून वाचवावे, अशा आशयाचे निवेदन दिले.
यावेळी रिपाईचे रविंंद्र चंदने, काँग्रेसचे चेतनसिंह पवार, शिवसेनेचे रामभाऊ दळवी, कांतीलाल कंटे, राम दुधाळे, कृष्णकांत तुपे, योगेश गुजर, राष्ट्रवादीचे राजाभाऊ सासे, दिपक वाघचौडे, प्रहारचे शरद पाटील, युवक काँग्रेसचे धनाजी बांगर, वैशाली घरत, संध्या कदम सह विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते.
या कृषी कायद्यान्वये बळीराजाच्या जमिनी मोठ्या उद्योगपतींंना जाचक कराराच्या माध्यमातून देण्यात येतील व पिकांसाठी कुठल्याही पध्दतीची किमान आधारभूत किंमत न देता पीक खरेदी केले जाणार आहे, असे मत काँग्रेस पक्षाचे चेतनसिंह पवार यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केले. सदरच्या कायद्यांं मार्फत देशातील शेतकऱ्यांना पुन्हा एकदा गुलामीकडे ढकलण्याचे काम केले जाणार आहे, असे प्रतिपादन यावेळी रिपाई सेकुल्यरचे रविंद्र चंदने यांनी केले. महाविकास आघाडी सरकारचे सर्व प्रमुख घटक पक्ष व पाठिंबा असलेल्या सर्व संघटना या शेतकऱ्यांसोबत असल्याचे यावेळी शिवसेनेच्या रामभाऊ दळवी यांनी सांगितले.
( किशोर गायकवाड )
___________________________________________



0 Comments