वीरतेची साक्ष : बलिदान दिनी यंदा हुतात्म्यांना करा 'असे' अभिवादन..! [ KISHOR K. GAIKWAD ]

Hutatma Jyot Murbad

वीरतेची साक्ष : बलिदान दिनी यंदा हुतात्म्यांना करा 'असे' अभिवादन..!  

[ KISHOR K. GAIKWAD ]  
मुरबाड (दि. ३०) : ठाणे, रायगड, पुणे जिल्ह्यातील तमाम लोकांचे श्रद्धास्थान असलेल्या सिद्धगडच्या बलिदान भूमीवर दरवर्षी १ व २ जानेवारी रोजी बलिदान दिना निमित्त आयोजित केले जाणारे सर्व सार्वजनिक कार्यक्रम यावर्षी कोरोनाच्या साथी मुळे रद्द करण्यात आल्याचे सिद्धगड स्मारक समिती मुरबाड तर्फे जाहिर करण्यात आले आहे.
Siddhagad Murbad
      
   भारतीय स्वातंत्र्य लढ्यात दि. २ जानेवारी १९४३ रोजी हुतात्मा वीर भाई कोतवाल व हुतात्मा वीर हिराजी पाटील यांना सिद्धगड येथे वीरगती प्राप्त झाली होती. त्यांच्या बलिदानाची आठवण ठेऊन दरवर्षी सिद्धगड येथे सिद्धगड स्मारक समिती विविध कार्यक्रम आयोजित करत असते. स्वातंत्र्य सैनिकांचे नातेवाईक, ठाणे व रायगड जिल्ह्यातील शाळांचे  विद्यार्थी, शिक्षक, मुख्याध्यापक, मशाल ज्योती आणणारी मंडळी, कुस्ती स्पर्धक, पैलवान व देशप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने कार्यक्रमास हजेरी लावत असतात. यावर्षी कोरोनाच्या धोक्यामुळे शासनाने लोकांना मोठ्या प्रमाणात एकत्र येण्यास बंदी घातली आहे. तसेच सिद्धगड येथे हुतात्म्यांना मानवंदना देण्यासाठी ज्या ठिकाणी हुतात्मा ज्योत प्रज्वलित केली जाते त्या ठिकाणी लोकांना सुरक्षित अंतर ठेऊन उभे राहण्यासाठी पुरेशी जागा नाही. हे लक्षात घेऊन सिद्धगड येथे दिनांक १ व २ जानेवारी २०२१ रोजी कोणतेही सार्वजनिक कार्यक्रम आयोजित केले नाहीत, अशी माहिती सिद्धगड स्मारक समितीचे अध्यक्ष तथा माजी आमदार गोटीरामभाऊ पवार यांनी शब्द मशालशी बोलतांना दिली आहे.
   
   तसेच सिद्धगड येथे २ जानेवारी रोजी सकाळी ६ वाजून १०  मिनिटांनी फक्त मोजक्या लोकांच्या उपस्थितीमध्ये हुतात्म्यांना अभिवादन केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले असून त्यामुळे सिद्धगड येथे लोकांनी उपस्थित राहू नये व सर्व देशप्रेमी नागरिकांनी आपल्या घरी किंवा गावात जेथे स्वातंत्र्य लढ्यातील स्मारक आहे, तेथे पहाटे ६ वाजून १० मिनिटांनी सिद्धगड रणसंग्रामात आहुती दिलेल्या हुतात्म्यांना अभिवादन करावे, असे आवाहन पवार यांनी केले आहे.

( किशोर गायकवाड )
___________________________________________




(शब्द मशालच्या कोणत्याही बातमीमध्ये काही त्रुटी, सूचना, दुरुस्ती अथवा मार्गदर्शन असेल तर वाचकांनी कृपया खालील कमेंट बॉक्समध्ये कळवावे ही विनंती)

0 Comments