![]() |
| PAYAL TADVI |
जात व्यवस्थेची बळी : डॉ. पायल तडवी!
बातम्यांचा शोध घेण्यासाठी अक्षरशः दिवसागणिक वाढत्या ३५-४० डिग्रीच्या तापमानात, उन्हातान्हात भटकावे लागते! तर कधी झोडपत्या पावसात आणि कुडकुडत्या थंडीत; याचे कोणी पगार तर देत नाही; पण कर्तव्य टाळता येत नाही. पत्रकाराच्या वाट्याला भटकंती कायमच; अशातच तालुक्यातील अनेक मागास, दीनदुबल्या, आदिवासी कुटुंबांशी संपर्क येतो. त्यांच्या सोबत वेळ घालवून तुटक्या मातीच्या कपात अथवा ठेचलेल्या एखाद्या स्टीलच्या कपात चहा पिण्याचा अनांद वेगळाच! मात्र यावेळी त्यांची दुःख, अडचणी ऐकतांना डोळ्यात निश्चितच अश्रू आल्याशिवाय राहत नाही.
आज ही मुरबाड तालुक्यातील आदिवासी वर्ग मुख्य प्रवाहापासून वंचित आहे. स्वयंघोषित उच्चभ्रू प्रजातीचा गणीत समाज या आदिवासी बांधावांना निव्वल घरगडी; 'ड' नव्हे तर इ' श्रेणीच्या कामगारापेक्षा खालचा कामगार वर्ग म्हणून पाहत हीन वागणूक देतो. दोन पैसे कुटुंबाला मिळावे म्हणून आदिवासी कुटुंबातील चिमुकलं म्हणा अथवा तरुण-पुरुष जनावरे वळण्यासाठी किंवा इतर मजुरीसाठी एखाद्या शेठच्या घरी घरगडी म्हणून स्वतःला जुंपतो. अशात त्याकडे फक्त एक मरमर काम करणारा जनावर म्हणून पाहिले जाते. अशी कामे करणाऱ्या तरुणांचे संशयित मृत्यू झाल्याच्या बातम्या ही आम्ही प्रकाशित केल्या आहेत. आज या समाजाला इतकं तुच्छ का लेखले जाते? हे समजणे अवघड झाले आहे. अनेक आदिवासी संघटना संघर्ष करीत आहेत. आदिवासींच्या न्याय हक्कासाठी लढे उभारत आहे. आता कुठे आदिवासी तरुण-तरुणी शिक्षणाकडे पाऊल टाकण्याचा धाडस करीत आहेत. मात्र यशाच्या वेशीपर्यंत पोहचण्याआधीच त्यांना निर्घृणपणे चिरडले जाते.
काल परवाचा पायलचा प्रकरण! काळजाला हादरून टाकतो. हा तो देश, जेथे आम्ही स्वतंत्र मिळावे म्हणून एकत्र लाल रक्त सांडवले. त्यानिमित्ताने आज आठवण होते राघोजीची, आठवण होते बिरसा मुंडाची, त्यांच्या उलगुलानची... पायल आम्हाला माफ कर! आम्ही तुला अपेक्षित न्याय देऊ शकत नाही. तुझ्यात सुरक्षिततेचा भावना आणि विश्वास निर्माण करू शकलो नाही. कारण आमच्या संवेदना मेल्यात. आम्ही भांगरे पण विसरलो, आम्ही मुंडा विसरलो. जागतोय ते फक्त यांच्या पालख्या वाहण्यासाठी; कारण या सरकारलाच आम्ही नकोत. तुझा खून झाला आणि आता हे आमचा पण खून करतीलच. कारण आमच्या पेशी फक्त गुलामीची भाषा जाणतात; तुझ्यासारखे शिकून मोठे होण्याला आम्ही महत्व देत नाही.
मोठया संघर्षातून हजारातून आदिवासी कुटुंबातील एखाद शिकतो, पुढे जाण्याचा प्रयत्न करतो. त्याला पण ही व्यवस्था टिकू देत नाही. काही अंतर न पोहचतोच, त्याचा आनंद घेण्यापूर्वीच खेळ समाप्त! हा खऱ्या अर्थी तमाम मागास, वंचितांचा अपयश आहे; ज्यांनी हा मनुष्यवध घडवून आणला, त्यांच्यात हा जातीचा विष कोणत्या अन्ननलिकेद्वारे ओतला जातो, याचा शोध घेणे गरजेचे आहे. ही जात्यंध आणि धर्मांध व्यवस्था आणि हिचे मूळ हद्दपार करणे लोकशाहीच्या हिताचे आहे. हे पाहून ही ज्यांच्या संवेदना बोथड झाल्यात, त्यांच्या रक्ताचे पंचनामे करणे आता गरजेचे झाले आहे.
आज देशातील घराघरात संविधानाची प्रत अपेक्षित असतांना जात्यंध आणि धर्माधचे विष रुजवणारी ग्रंथ अधिक आढळतात.
मानवी वृत्तीचा अभ्यास करून त्यांच्या मेंदू मध्ये द्वेषाचा, घृणेचा, इर्षेचा आणि जातीयवादाचा विष ओतण्याचे काम सर्व स्तरावरून सुरू आहे. यात टेलिव्हिजन मध्यम अग्रेसर भूमिका घेत आहे. हल्ली आणि मागील दशकाचे टीव्ही सीरिअल पाहता यात सासु-सून असेल अथवा दोन महिला यांच्यातील नाते नेहमी परस्पराविरोधी हमखास दाखविले जाते. त्यांच्यातील तिरस्कार घरातील महिला संधी मिळेल तेथे चर्चा करीत असतात आणि पुढे नकळतपणे स्वतः त्या भूमिकेला आपल्या दैनंदिन जीवनात जगू लागतात. यातून नको ते कौटुंबिक वाद निर्माण होण्याच्या घटना घडत असतात. त्याचे विपरीत परिणाम अक्षरशः जीवावर ही बेतलेले कानी पडतात. त्यामुळे या द्रोही व्यवस्थेचे मुख्य हेतू साध्य होत आहे.
दोन भिन्न जमातीतील प्रेम विवाह अक्षरशः जीवावर बेततात आणि हे आपल्या महाराष्ट्रात सहज घडतं! आणि यावर बनविलेला चित्रपट सहज कोट्यावधी कमवून जातात. समाज काय बोलेल? फक्त या एका प्रश्नाला न्याय देण्यासाठी अनेक प्रेमी युगुलांचे मुडदे पडल्याच्या बातम्या कानी पडतात. अशा विषारी विचारधारेच्या समाजाला आपल्या डोक्यात जिवंत ठेवणाऱ्यांच्या विरोधात आपण एकत्र लढून हद्दपार करणे गरजेचे आहे.
देशात या घातकी व्यवस्थेकडून जात्यंध, उच्चनीचता, स्पृश्य-अस्पृश्य हा द्वेष बिंबविण्याचे कार्य अगदी प्रामाणिकपणे सुरू आहे. या व्यवस्थेचे जंतू घराघरात पोहचत आहेत. भोळ्याभाबड्या जनतेला वेठीस धरायचे आणि त्यांच्यात समाजद्वेषाची बीजे पेरायची, विविध माध्यमांद्वारे त्यांच्यावर बिंबवत राहायचे; आणि यातून शेकडो पायलचे खून घडवून आणायचे. कारण यांना मागास घटक शिक्षित झालेला अपेक्षित नाही. अन्यथा या स्वयंघोषितांच्या चाकऱ्या कोण करेल? ही भीती कदाचित त्यांच्यात निर्माण होत आहे. त्यांना मागासवर्गीय घटकांची गुणवत्ता टोचत असावी! संविधानाने जर सर्वांना समानतेची संधी दिली आहे, तर भरपूर शिकायचे; तुमचा संघर्ष कमी होता काम नये. आता पुन्हा कोणी पायल गमावता कामा नये. तेव्हा सर्वांनी संघटित व्हायचे! कारण आता तुमचा लढा तुम्हालाच जिंकायचे. हीच खरी मानवंदना असेल तुकोबा, शिवराय, फुले, शाहू, आंबेडकर, बिरसा यांच्या कार्याला आणि विचारांना...
-किशोर गायकवाड
(७०३८८४३४४४)

0 Comments