"काय खायले असेल तं लेकराले द्या दादा..!" ...आणि हे शब्द माझ्या चेहऱ्यावर पडले... मुरबाड तालुक्यातील पवाळे फाट्यावरून काल सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास काही महिला, माणसे व लहान मुले मुरबाडच्या विरुद्ध दिशेने लगबगीने चालत होती.
डोक्यावर कपड्यात गुंडाळलेली ओझी, कोणाच्या खांद्यावर लहान बाळं तर कुणाच्या कुशीत, आणि काहींच्या हातात समानाच्या पिशव्या; आणखीन एक ओझं होतं, ते म्हणजे घामाचं!
असे एकंदर प्रथमदर्शनी हे चित्र! बर ते इंग्लिश मास्क, सॅनिटायजर याचा नामोनिशाण त्यांच्याकडं दिसला नाही. त्या व्यतिरिक्त सोबत होती ती भूक आणि घरची ओढ...!
त्यातील एका महिलेची आम्ही चौकशी केली. लोणावळ्यावरून पायी ही २५ माणसे अमरावतीच्या दिशेने निघाली असल्याचे तिने हतबल झालेल्या स्वरात सांगितले. त्यात त्यांचा कोणी हरामखोर ठेकेदार त्यांना या अवस्थेत टाकून पळाल्याने त्यांच्यावर ही परिस्थिती ओढवली असल्याचे ही तिने, लागलेला दम आवरत सांगितले. दरम्यान आपल्या लेकराला काही खाण्यासाठी असेल तर द्यावे, अशी तिने विनंती केली. बोलण्यात त्या मायलेकाच्या रक्ताळलेल्या पायांकडे लक्ष गेले, पादत्राणे नसल्याने दोघांच्या पायांच्या साली गेल्या होत्या.
कदाचित यामुळेच ते आपल्या जत्थ्यापासून मागे पडले असावेत. असे असतांना ही वेळेने दिलेल्या जखमेपुढे या वेदनांना त्यांनी काही विशेष महत्त्व दिलेले दिसत नव्हते. त्या महिलेचा विरोध असतांना ही न राहवल्याने माझे सहकारी पत्रकार अरुण ठाकरे यांनी आपल्या पायातील पॅरागॉन सँडल आवर्जून तिच्या मुलाला दिले.
मात्र अद्यापही परिस्थितीच्या जाणिवे सारखीच त्या बालकाच्या पायांची रुंदी त्या सँडलच्या मापाच्या तुलनेत खुजी असल्याने त्याच्या मातेला ते स्वीकारने आम्ही भाग पाडले. तेव्हा तिने वेदना भरल्या तालात तोंडात कुजबुजत त्यांच्या भाषेत आशिर्वाद दिल्याचे स्पष्ट भासले.
आमच्या चौकशीमुळे त्यांच्या सोबतीदारांपासून त्यांचे अंतर अधिक वाढत असल्याने आम्हाला आमच्या चौकशीला पूर्णविराम देणे भाग झाले. तसे ही त्यांच्या वेदनेंचा ओझा स्वीकारने आम्हाला अशक्य होते.
आपण आपापल्या घरी सुरक्षित आहोत, हवं ते पक्वान्न शिजवून खातोय, तरी आपल्या अपेक्षा कमी होत नाहीत.
जसजसे ते मायलेक दूर जात होते, या आणि अशा अनेक तक्रारींची उजळणी डोळ्यांसमोरून फेरफटका मारून गेली. पण विश्वास ठेवा, तुम्हाला हे वाचून जसं वाटतंय ना, सारखंच मला वाटलं; खरंच एकदा तो हरामखोर ठेकेदार भेटला पाहिजे, मग हातून अपराध घडला तरी बेहत्तर!
आणि आता हे पुढचं ही ऐका...
आम्ही त्या परिसरात नजरेस पडलेल्या काही स्थानिक माणसांना यांना मदत करण्याची विनंती केली. त्यावर त्यांनी हा जत्था पहिल्यांदाच पाहिला नसून रोजच या मार्गे वाट तुडवीत अशा अनेक कुटुंबांचे प्रवास सुरूच
असल्याची आश्चर्यकारक माहिती दिली. मात्र आमच्या कानांना ते ऐकण्या पलीकडे आता गत्यंतर नव्हते.
ज्या महामार्गाने आपली कात टाकण्यासाठी शेकडो कोटी रुपये गिळंकृत केले, स्वतःच्या लांबी रुंदी सहित मोठ्या ऐटीत आपला मिजास, सौंदर्य वाढवण्यास घेतला आहे; तो मिजास, तो रूबाब या लेकराने कोणत्याही आलिशान वाहना शिवाय आपल्या पायांनेच जिरवीला. आता ऐका... ऐकाच ही जिवंत कहाणी..!
#महामार्ग..!
गुदमरलाय आज दम,
हवा कुशीत असतांना,
सांगा घेऊ कसा श्वास?
अवघी हवाच दूषित असतांना,
तहान ही लागले फार,
पाणी ओठावर असतांना,
पिण्यास सांगू कसं लेकराला?
त्या पाण्यातच विष असतांना!
परिस्थिती ओढवले अशी,
नाकारून ही शरण आहे
उजमले सामोरे गेल्यावर;
आता स्वीकारून ही मरण आहे!
खरचं, तो गर्व ही आता हरला,
त्या गर्विष्ठ महामार्गांचा,
जेव्हा या पायांनीच तुडविला,
मोजमाप त्याच्या सर्वांगाचा!
मोजमाप त्याच्या सर्वांगाचा!
-किशोर गायकवाड
(आवडल्यास अथवा शक्य झाल्यास share करावे)
0 Comments