
Malshej Ghat Murbad
माळशेज अपडेट्स : माळशेज मार्गे धोकादायक प्रवास कायम..
Malshej Ghat Update : Dangerous journey through Malshej Ghat continues..
नागरिक सुरक्षित प्रवासाच्या प्रतिक्षेत
मुरबाड (किशोर गायकवाड) : संपूर्ण राज्याभर ख्याती असलेला मुरबाडमधील (Murbad) माळशेज घाट (Malshej Ghat) दिवसेंदिवस प्रवासाठी धोकादायक होत चालला असून सुरक्षिततेच्या उपाययोजनां अभावी या महामार्गावरील प्रवास जीवघेणा ठरत असल्याच्या तक्रारी वाढतच आहेत.
मुरबाड (Murbad) हद्दीतील सावर्णे ते माळशेज घाटाच्या (Malshej Ghat) कामांची अवस्था पाहता, रस्ता व त्यावरील कामांची गुणवत्ता सुमार दर्जाची असल्याने धोकादायक कठड्या सोबतच जागोजागी रस्ते खड्डेमय अवस्थेत पाहायला मिळतात. तर पाण्यापावसात, दाट धुक्यात, वाहनचालकांना वाट शोधावी लागते. अशावेळी रस्त्यालगतचा पांढरापट्टा हा एकमेव आधार ठरतो. रात्रीच्या दरम्यान वाहनचालक या रस्त्याच्या पांढऱ्या पट्ट्याच्या आधारे अंदाज घेत कसरत करीत वाहने चालवतात. या घाटाच्या सुशोभीकरण व दुरुस्तीसाठी गेल्या दहावर्षात खर्ची लागलेल्या करोडोंच्या निधीवर आजवर अनेक ठेकेदार मालामाल झाले. मात्र रस्त्यावरचा ग्रहण काही सुटला नाही. घाट भागात अनावश्यक ठिकाणी मोठमोठ्या लोखंडी जाळ्या लावण्यात येऊन रस्त्या लगतचे अनेक धोकादायक सुळके पुढच्या वर्षाला काम काढण्याच्या उद्देशान राखीव ठेवलेले स्पष्ट दिसून येत आहेत. कोट्यावधींच्या निधीत किमान रस्ता तरी पूर्ण सिमेंट काँक्रीटचा होणे अपेक्षित असतांना तसे चित्र पाहायला मिळत नाही. मात्र माळशेज रस्ता सुधारून समस्या मुक्त झाला तर ठेकेदारांना पोसायचे कसे? व सोबत कमाईच्या साधनांवर ही पाणी पडणार? अशी चर्चा ऐकायला मिळत आहे. हे चित्र पाहता कधीतरी पिकनिक अथवा सहल म्हणून विकास दादाला हा पावसाळ्यातील रस्ता दाखवायला हवाच, असे वाहन चालक पोटतिडीकीनं आपल्या व्यथा मांडताना सांगत आहेत. राज्यभरातले नॅशनल हायवे हे चौपदरी सिमेंट काँक्रीटीचे होण्याच्या मार्गवर आहेत. मात्र एकमेव माळशेज याला अपवाद ठरत असल्याचे म्हणावे लागेल.
माळशेज (Malshej Ghat) बनवतोय मृत्यूशेज..!
माळशेज घाटात (Malshej Ghat) वर्षभरात सुमारे १२७ अपघात झाल्याची नोंद आहे. दि. २ जानेवारी २०१४ ला याच घाटात विठ्ठलवाडी-भगवानगड बस कठडा तोडून दरीत कोसळून सुमारे ३२ जनांचे बळी गेले होते. त्यानंतर अशा अनेक लहानमोठ्या अपघातांत अनेक निष्पाप प्रवाश्यांना आपले नाहक जीव गमवावे लागले आहे. त्यामुळे वाहतुकीच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा असलेला माळशेज घाट हा अनेक अडचणीमुळे जणू मृत्यूचा घाट बनला आहे. अरुंद रस्ता, नागमोडी वळणे, खोल दरी यातून वाट काढत रोज लाखो प्रवाशांना आपल्या जीवावर उदार होऊन यामार्गे प्रवास करावा लागत आहे. अनेक ठिकाणी संरक्षण भिंती नसल्याने कोणत्याही क्षणी वाहने खोल दरीत कोसळण्याचा धोका असून दिशादर्शक फलक देखील गायब आहेत. त्यातच रस्त्या लगत वाढलेली झाडे-झुडपे, गवत अपघातास कराणीभूत ठरत आहेत. यामुळे 'माळशेज घाटातील प्रवास नको रे बाबा' असे म्हणण्याची वेळ वाहन चालक व प्रवाश्यांवरआली असून माळशेज हा मृत्यूशेज बनतोय अशा प्रतिक्रिया समोर येत आहेत.
माळशेज घाटातील (Malshej Ghat) सुविधांसाठी आतापर्यंत कोट्यावधी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. पण तो नेमका कुठे खर्च झाला? याचे कोढे अद्याप उलगडलेले नाही. माळशेज घाटातून रोज असंख्य वाहने ये-जा करत असतात. सावर्णे पासून एमटीडीसीपर्यंतचा हा १२ किलोमीटरचा प्रवास असून या रस्त्याच्या देखभाल, दुरुस्तीकडे राष्ट्रीय महामार्ग विभागाचे सपशेल दुर्लक्ष झाल्याचे स्पष्ट होत आहे. या माळशेज घाटात सहा ठिकाणी संरक्षक भिंती कोसळलेल्या नजरेस पडत असून अद्याप त्याची डागडुजी झालेली नाही. जेथे संरक्षण भिंती बांधण्याची गरज आहे तिथे या भिंती बांधल्या जात नाहीत. धोकादायक वळणांवर ठेकेदार संरक्षण भिंती बांधायला सहजासहजी तयार होत नाहीत. कारण एका बाजूला खोल दरी आणि धोकादायक वळण यामुळे ज्यादा मनुष्यबळ तसेच अधिक बांधकाम साहित्य लागणार आहे. त्यावर पैसाही मोठ्या प्रमाणात खर्च होणार. परिणामी ठेकेदार त्यापासून पळ काढतात. सबब प्रवाश्यांना सुरक्षित माळशेज (Malshej Ghat) प्रवासाची हमी मिळणार की सुरक्षित माळशेज हे स्वप्नच राहणार? या प्रश्नाच्या उत्तराच्या प्रतीक्षेत मुरबाडकर आहेत.
तर याबाबत अधिक माहितीसाठी मुरबाडच्या (Murbad) राष्ट्रीय महामार्ग उपविभागाचे सहाय्यक कार्यकारी अभियंता एस. एस. शिंगाडे यांचेशी संपर्क साधला असता काही अपिहार्य कारणामुळे संवाद होऊ शकला नाही. मात्र तालुका लोकप्रतिनिधी यावर गांभीर्याने लक्ष देतील का? हे पाहणे औत्सुक्याचे म्हणावे लागेल.
ADV







0 Comments