#IMPACT : रिपाइंच्या आंदोलना आधीच बीडीओचं पत्र..!
"कारवाईला विलंब झाल्यास पंचायत समितीच्या दारात जागर-गोंधळ घालू" -रविंद्रचंदने
KISHOR GAIKWAD | SHABD MASHAL
मुरबाड (दि. १८) : (किशोर गायकवाड) मुरबाड पंचायत समितीच्या (Panchayat Samiti, Murbad) सुस्त आणि मनमानी अधिकाऱ्यांना जागे करून भोंगळ कारभाराच्या सावळ्या गोंधळाला थांबविण्यासाठी रिपइं सेक्युलरने पंचायत समितीच्या दारात 'गोंधळ-जागर' आंदोलनाचा पत्र दिला होता. याबाबत पंचायत समिती (Panchayat Samiti, Murbad) सुप्रीमोंनी धसका घेत सदर पत्राला त्वरित उत्तर देत दि. २८ फेब्रुवारी पर्यंतचा कालावधी मागून घेतला असून आंदोलन तूर्तास स्थगित करण्याची विनंती केली आहे. मात्र कारवाईला विलंब झाल्यास पंचायत समितीच्या (Panchayat Samiti, Murbad) दारात जागर गोंधळ घालून आंदोलन तीव्र स्वरूपात करू व त्यानुसार होणाऱ्या परिणामांना सर्वस्वी वरिष्ठ अधिकारी जबाबदार असल्याचे रिपाइं सेक्युलरचे (RPI) ठाणे जिल्हा अध्यक्ष पँथर रविंद्र चंदने (Ravindra Chandane) यांनी आजच्या आयोजित पत्रकार परिषदेत (Press Conference) सांगितले. यावेळी तालुका युवक अध्यक्ष राजेश गायकवाड, बहुजन विद्यार्थी संघटनेचे निखिल अहिरे, रविंद्र गायकवाड, भरत माळवे, अविनाश रातांबे सह अन्य कार्यकर्ते व मोठ्या संख्येने पत्रकार उपस्थित होते.
मुरबाड पंचायत समिती अंतर्गत शासनाच्या विविध योजना, जनसुविधेतील कामे, प्रधानमंत्री आवास योजनेच्या सर्वेक्षणाचा सावळा गोंधळ, अशा विविध मुद्द्यांबाबत रिपइं सेक्युलरने (RPI SECULAR) वेळोवेळी पत्र व्यवहार केला होता. परंतु याची दखल घेतली गेली नसल्याने भ्रष्ट प्रशासनाला जागे करण्यासाठी तालुक्यातील सर्व सामान्य नागरिक, दलित, आदिवासी, वंचित घटकातील जनतेला सोबत घेऊन सोमवार दिनांक २१ फेब्रुवारी २०२२ रोजी सकाळी ११:०० वाजेपासून मुरबाड पंचायत समितीच्या कार्यालयासमोर ‘जागर व गोंधळ’ घालून पंचायत समिती प्रशासनाचा निषेध करण्यासाठी येणार असल्याचे पत्र रिपइं सेक्युलरने दि. १५ फेब्रुवारी दिले होते. सदर पत्र प्राप्ती नंतर खडबडून जागे झालेल्या पंचायत समिती प्रशासनाने आंदोलन स्थगित करण्याचे विनंती पत्र दुसऱ्याच दिवशी देऊन २८ तारखे पर्यंतचा कालावधी मागून घेतला आहे.
मुरबाड तालुक्यातील (Murbad Taluka) बोगस डॉक्टरांनां अभय देणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी कायदेशीर कारवाई करावी, डॉ. तेलवणे याला वाचवणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांची चौकशी करून कारवाई करण्यात यावी, जिल्हा परिषद शाळा भुईपाडा येथील शिक्षक यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापारीनिर्वान दिनी शासकीय नियमात शालेय वेळेत अभिवादन केले नाही. याची तक्रार केली असता केंद्रप्रमुख घुडे यांनी आर्थिक व्यवहार करून सदरच्या शिक्षकांना वाचवले आहे. याबाबत वारंवार तक्रार करून सुद्धा कोणतीही कारवाई केली गेली नसून याबबत तात्काळ कारवाई करण्यात यावी, प्रधानमंत्री आवास योजना व इतर आवास योजना अंतर्गत पात्र लाभार्थ्यांच्या 'ड' यादीमध्ये नियुक्त अधिकाऱ्यांनी घोळ घालून ग्रामपंचायत डेहनोली येथील श्रीमती आशा मनोहर शेवाळे यांना मयत दाखवले आहे. ग्रामपंचायत आसोळे येथील दामू कोर यांना अपात्र, इंदुबाई घरत यांच्यासारख्या अनेकांना प्रतीक्षेत ठेवले आहे. तर पंचायत समिती, मुरबाड मधील डाटा ऑपरेटर सुधाकर गणू कुर्ले व त्याचे नातेवाईक हे पात्र लाभार्थी आहेत म्हणून सदरचा सर्वेक्षण निकोप व निरपेक्ष करण्यात यावा. तसेच सुधाकर गणू कुर्ले यांना या पदावरून काढून टाकावे, मौजे बांदलपाडा ते खेडले रस्ता बांधणी डांबरीकरण व संरक्षण भिंतींचे काम जि.प. सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी केलेले नसतांनाही त्यावर खर्च दाखवून मोठा भ्रष्टाचार केला आहे. याची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, मौजे टाकीचीवाडी ते तळ्याचीवाडी डांबरीकरण रस्ता निकृष्ट केलेला आहे. तसेच हा रस्ता अंदाज पत्रकाप्रमाणे तयार केलेला नाही. त्यामुळे ठेकेदारावर व देखरेख करणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई करावी. तसेच हे काम करणाऱ्या एजन्सीला काळ्या यादीत (Black List) टाकावे, तालुका विक्री केंद्रातील गाळ्यांचे सोडत पद्धतीने जाहीर लिलाव वाटप करावे, तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमधील रिक्त जागा तात्काळ भरण्यात याव्यात, शिवळे गावच्या हद्दीत जानेवारी २०२२ मध्ये बांधण्यात आलेल्या बंधाऱ्यात मोठ्या प्रमाणात दगडी गोटे टाकले आहेत. तरी हे काम तोडून पुन्हा अधिकाऱ्यांच्या खर्चात बांधून घ्यावे. तसेच हे काम करणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करावी व हे काम करणाऱ्या एजन्सीला काळ्या यादीत (Black List) टाकावे, लॉक डाऊन काळात मौजे खोपिवली येथे नळ पाणी पुरवठा योजनेचे कोणत्याही प्रकारचे काम न करता नऊ लाख रुपये काढून खाल्ले आहेत. तरी या अपहाराची चौकशी करावी व हा निधी नळ पाणी पुरवठा समितीकडून वसूल करावा, बोगस डॉक्टरांना दुकाने थाटण्यासाठी गाळे किंवा घरे भाड्यात देणाऱ्या घरमालकांवर तसेच या बोगस दवाखान्यांना परवानगी देणाऱ्या संबधित ग्रामसेवकांवर कारवाई करावी अशा विविध मागण्यांसाठी आंदोलनाचे आयोजन केले असल्याचे चंदने यांनी आज आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत पत्रकारांशी बोलतांना सांगितले. मात्र २८ फेब्रुवारी पर्यंत सर्व मागण्यांची दखल घेतली गेली नाही तर आंदोलन आणखीन तीव्र स्वरूपात करणार असल्याचे त्यांनी सांगितले. तर याबाबत पंचायत समिती जलदगतीने काय कारवाई करते? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
"पंचायत समिती अंतर्गत आरोग्य विभाग, पाणीपुरवठा अशा विविध विभागांच्या बाबत दहा मागण्या रिपाइं सेक्युलरने केल्या असून संबंधित सर्व खाते प्रमुखांना पत्रव्यवहार करण्यात आला आहे. मंगळवार-बुधवार पर्यंत त्यांचे अहवाल घेऊन येत्या २८ तारखेपर्यंत आंदोलकांना सादर करण्यात येईल. दरम्यान त्यांना एकदा चर्चेला बोलवून या सर्वांची पूर्तता केली जाईल. ज्याठिकाणी चुकीचा आढळलेल, त्याठिकाणी आवश्यक ती कारवाई केली जाईल."
-श्री. रमेश अवचार
(गटविकास अधिकारी, पंचायत समिती, मुरबाड)
_______________________________________________
[#मुरबाड माळशेज अपडेट्स : माळशेज मार्गे धोकादायक प्रवास कायम..!]
असेच नवनवीन उपडेट्स साठी खाली दिलेल्या बटन वर क्लिक करून आमच्या टेलिग्राम चॅनलला सबस्क्राईब करा


असेच नवनवीन उपडेट्स साठी खाली दिलेल्या बटन वर क्लिक करून आमच्या टेलिग्राम चॅनलला सबस्क्राईब करा




0 Comments