प्रतीक्षा संपली : शरद पवारांच्या हस्ते 'सेनापती' चे प्रकाशन
[ KISHOR K. GAIKWAD ]
मुरबाड : (दि. २८) अनेक महिन्यांपासून प्रतीक्षेत असलेले 'सेनापती' पुस्तक अखेर वाचकांच्या भेटीला आले असून यात देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात प्राण पणाला लावलेल्या सैनिकाचा जीवनपट प्रकाशात आणला आहे.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई येथे बुधवारी माजी केंद्रीय कृषी मंत्री शरदचंद्र पवार (Sharad Pawar) यांच्या हस्ते व रायगड जिल्ह्याचे खासदार सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांच्या अध्यक्षतेखाली हा प्रकाशन सोहळा संपन्न झाला. यावेळी प्रमोद हिंदुराव तसेच अनेक दिग्गज राजकीय पदाधिकारी, प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.
मुरबाड तालुक्यातील नामवंत लेखक एकनाथ देसले यांनी या ऐतिहासिक पुस्तकाचे लेखन केले असून यापूर्वी ही अशा विविध विषयांवर त्यांनी लिखाण केले आहे. त्यांनी दिग्दर्शित केलेला शाहिद भाई कोतवाल या देशभक्तीपर चित्रपटाला महाराष्ट्रभर जनतेने उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला. आता त्यांच्याच लेखणीतून आकारास आलेला या पुस्तकाला वाचक वर्ग भरभरून प्रतिसाद देईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. तर पुस्तकासाठी प्रमोद हिंदुराव व ज्योती हिंदुराव यांनी मोलाचे सहकार्य केल्याचे लेखक देसले यांनी सांगितले.
देशाच्या स्वातंत्र्य चळवळीत अनेकांनी निष्ठेने काम केले. प्रसंगी आपल्या प्राणाची आहुती दिली. मात्र यातील काही स्वातंत्र्य सेनानी, शहिद आजही नव्या पिढीला माहिती नाही. असेच एक थोर सेनानी 'सेनापती हरी नारायण देशमुख' यांचा संघर्षमय जीवनपट मांडण्याचा परिपूर्ण प्रयत्न त्यांनी केला असून यापुढेही शक्य तितक्या राष्ट्रपुरुष, स्वातंत्र्य सेनांनीचा इतिहास उजेडात आणण्यासाठी असाच लिखाण सुरू ठेवणार असल्याचे ही त्यांनी सांगितले.
स्वातंत्र्य प्राप्तीनंतर सामान्य माणसाला न्याय देण्यासाठी काम करा, या महात्मा गांधीजींनी दिलेल्या संदेशानुसार काही लोकांनी काम केले. अशा व्यक्तिमत्त्वांमध्ये 'सेनापती हरी नारायण देशमुख' यांचे नाव घेतले तरी अतिशयोक्ती होणार नाही. समाजातील शेवटच्या माणसाच्या डोळ्यातील अश्रू पुसण्यासाठी स्वातंत्र्य हवे, हा गांधीजींचा विचार कृतीमध्ये आणण्यासाठी सेनापती हरी नारायण यांनी भाई कोतवाल यांच्या सह काम केले.
भारताच्या स्वातंत्र्य लढ्याची माहिती देणारे, सर्वमान्यांना प्रेरणा देणारे तथा त्यांच्यात देशभक्तीचे स्फुल्लिंग चेतवणारे, अशा आशयाचे हे पुस्तक असल्याचे प्रकाशकांकडून सांगितले जात आहे. तर अशा अनेक धाडसी स्वातंत्र्य वीरांची माहिती समाजा पर्यंत पोहचावी, समाज असाच प्रेरित व्हावा, हाच माझा उद्देश आहे. असे मत शरद पवार यांनी यावेळी व्यक्त केले. त्यामुळे वाचक वर्गात या पुस्तकाला मिळविण्यासाठी उत्सुकता लागली असून पुस्तक लवकरच हाती मिळविण्यासाठी वाचकांनी ७०८३६७५१११ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन लेखक देसले यांनी केले आहे.





0 Comments