चिंताजनक : टेक्नोच्या सहा दिवसीय उपोषणाला सोमवारचा अवधी!
उपोषणकर्त्यांच्या खालावलेल्या प्रकृतीने धानिवलीकर संतप्त
[ KISHOR K. GAIKWAD ]
मुरबाड : (दि. २०) केंद्र सरकारच्या नव्या कामगार कायद्याची अंमलबजावणी करीत मुरबाडमधील प्रसिद्ध टेक्नोक्राफ्ट इंड्र. इंडिया लि. कंपनीने आपला पाॅवर डिव्हीजन प्लांट बंद केल्याने तालुक्यातील रोजगार संपुष्टात आलेल्या अनेक स्थानिक कर्मचाऱ्यांनी अखेर सिटू संघटनेच्या माध्यमातून आमरण उपोषणाची भूमिका घेतल्याने मुरबाडमधील प्रशासन आता चांगलेच कामाला लागले दिसून येत आहे.
कंपनीतून कमी केलेल्या कर्मचाऱ्यांना त्वरित कामावर घ्यावे, गाव वाचवा कृती समिती, धानिवली यांचे सोबत केलेल्या कराराची अंमलबजावणी करण्यात यावी, मुरबाड तालुक्यातील स्थानिकांना रोजगार देण्यात यावा अशा विविध मागण्या घेऊन पीडित कर्मचारी वसंत नारायण भोईर, महेंद्र रमाकांत कराळे, मनोज शिवाजी राणे, कमलाकर यशवंत भोईर यांनी दिनांक २१ डिसेंबर पासून कंपनीच्या गेट समोर आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. यातील उपोषणकर्ते वसंत नारायण भोईर यांची प्रकृती खालावल्याने त्यांना काल सरळगाव येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून अन्य उपोषणकर्त्यांची ही सारखीच अवस्था आहे. मात्र असे असून ही कंपनी प्रशासन त्यांच्या मागण्यांकडे कानाडोळा करीत असल्याचे दिसून येत आहे.
या संदर्भात शुक्रवार सायंकाळी ७ वा. मुरबाड पोलिस स्टेशन येथे मिटींग घेण्यात आली होती. यावेळी सिटूचे राज्य सदस्य व शहापूर तालुका जनरल सेक्रेटरी काॅम्रेड प्रशांत महाजन, शहापूर तालुका कार्याध्यक्ष काॅम्रेड अशोक विशे, मुरबाड तालुका अध्यक्ष काॅम्रेड दिलीप कराळे, कामगार प्रतिनिधी काॅम्रेड चंद्रकांत राणे, वसंत भोईर, महिंद्र कराळे, रामदास भोईर, किरण भोईर व इतर कार्यकर्ते, कामगार तसेच कंपनी व्यवस्थापनाचे अमोल म्हात्रे, शशिकांत माने, पोलिस निरीक्षक दत्तात्रेय बोराटे, पोलीस नाईक विनायक खेडकर चर्चेला उपस्थित होते. सुमारे ५५ कामगार हे ८ ते १० वर्षांपासून कंपनीत काम करत असून सर्व स्थानिक व धानिवली ग्रामपंचायत मधील भुमिपुत्र असून कंपनी व्यवस्थापनाने १४ नोव्हेंबर २००८ मध्ये गाव वाचवा कृती समिती, धानिवली यांच्या सोबत लेखी करार केलेला असतांना ही कंपनीने कराराचा भंग करून लाॅकडाउन काळात या कामगारांना पाॅवर प्लांट बंद केल्याचे दाखवून या कामगारांना कामावरून कमी केले आहे. तसेच कंपनी अंतर्गत कामकाज सुरू असून २००० ते २५०० कामगार यात कार्यरत असल्याची माहिती कॉम्रेड कराळे यांनी दिली आहे.
कंपनी व्यवस्थापन व कामगार आयुक्त कल्याण यांच्या सोबत अनेक बैठका होऊन तसेच मोर्चा आंदोलन करून तहसीलदारांना वरिष्ठ व्यवस्थापनाशी बोलून बैठक लावण्याचे आश्वासन देऊनही बैठक आयोजित करण्यात आली नव्हती. त्यामुळे उपोषणाचा मार्ग पत्करला असल्याची माहिती कराळे यांनी दिली आहे.
कामगारांच्या उपोषणाचा आज सहावा दिवस असतांना ही मुरबाडचे तहसीलदार मात्र एकदाही उपोषण कर्त्यांच्या भेटीला उपस्थित राहिले नसल्याचे कराळे यांनी सांगितले. तर उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावल्याची वार्ता मिळताच धानिवली गावचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपोषणाच्या ठिकाणी येऊन ठिय्या मांडून कंपनी प्रशासना विरोधात दिवसभर घोषणाबाजी करीत होते. तसेच अनेक राजकीय, सामाजिक पक्ष, संघटनांनी, समाजसेवकांनी या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी उपस्थित होते. मात्र उपोषणकर्त्यांचा वाढता पाठिंबा पाहता दोन्ही पक्षांची चर्चा घडवून सोमवारी सुमारे १ वाजेच्या सुमारास याबाबत ठोस निर्णय दिला जाणार असल्याची माहिती सिटू तालुका अध्यक्ष कराळे यांनी दिली आहे. तर कंपनी प्रशासन याबाबत नेमकी काय भूमिका घेते? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
"गेली १२ वर्षे माझे वडील या कंपनीमध्ये परमनंट वर्कर म्हणून काम करीत होते. लॉकडाउनचा कारण सांगून कोणतीही पूर्व सूचना न देता त्यांना कामावरून काढून टाकले. याबाबत कोणताही पत्रव्यवहार अथवा आर्थिक व्यवहार कंपनीने केला नाही. गावातील एकूण ६५ कामगारांवर हा अन्याय झाला आहे."
- आशा वसंत भोईर (उपोषणकर्ते वसंत भोईर यांची मुलगी)
"लॉक डाउनचा फायदा घेऊन आज नऊ महिने झाले आम्हाला कामावरून काढलेले आहे. आम्ही एकूण ५४ कामगार आहोत. आम्हाला आतमध्ये कामावर सामावून घ्यावी, ही एमची प्रमुख मागणी आहे. उपोषणा दरम्यान आमचा एक सहकारी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे. तरी कंपनी प्रशासन, तहसीलदार साहेब अजून इथे आलेले नाहीत."
- कमलाकर यशवंत भोईर (उपोषणकर्ते)
"टेक्नो कंपनी प्रशासनाने चालवलेली ही हुकूमशाही, गुंडगिरी आहे. आमच्या भूमिपुत्रांना न्याय देण्यासाठी, त्याच्या लढात आम्ही सातत्याने सोबत आहोत."
- रामभाऊ दुधाळे (सामाजिक कार्यकर्ते)
"लॉकडाउनचा निमित्त घेऊन, केंद्रीय कामगार कायद्याचा आधार घेऊन टेक्नोच्या मॅनेजमेंटने त्यांना तडकाफडकी कामावरूनकार्यमुक्त केलेले आहेत. जर प्रशासन, तहसीलदार, कामगार उपायुक्त याबाबत योग्य निर्णय घेत नसतील तर आम्ही सर्व सामाजिक संघटना या लढ्यामध्ये सहभागी करून घेऊ आणि लढा आणखीन तीव्र करू"
- रविंद्र चंदने (सामाजिक नेतृत्व)
"टेक्नो प्रशासनातील निर्णायक अधिकार असलेले जबाबदार पदाधिकारी सोमवारी येऊन चर्चा करणार आहेत. त्यातून अपेक्षित मार्ग न निघाल्यास सिटू तर्फे तीव्र आंदोलन करू"
- दिलीप कराळे (तालुका अध्यक्ष, सिटू)
"या कंपनीने जमीन घेतांना तेथील गावकऱ्यांना नोकरी देण्याचे लेखी अग्रीमेंट केले आहे आणि आता दहाबारा वर्षां नंतर त्यांना कामावरून कमी केले आहे. सुमारे दीड हजार लोक या टेक्नो ग्रुपमध्ये काम करतात. तेथे त्यांचे चार-पाच प्लांट आहेत. त्याठिकाणी या कमी केलेल्या कामगारांना कामावर घ्यावे, ही आमची प्रमुख मागणी आहे. त्यांनी गावकऱ्यांची, शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. प्रशासन आणि खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यामध्ये लक्ष घालावे व आमच्या पीडित कर्मचाऱ्यांना न्याय द्यावा."
- डॉ. डी. एल. कराड (CITU राष्ट्रीय उपाध्यक्ष)
( किशोर गायकवाड )
___________________________________________




0 Comments