#ElectionUpdates : ऑनलाइन डिजिटल प्रणाली मंदावली... ऑफलाईन फॉर्मला परवानगी...
[ K. K. Gaikwad ]
मुरबाड : (दि. ३०) माहे एप्रिल-२०२० मध्ये मुदत संपलेल्या महाराष्ट्रातील सुमारे १४,२३४ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम प्रक्रियेमध्ये नामनिर्देशन फॉर्म भरण्याची आजची शेवटची तारीख असतांना गेल्या काही दिवसांपासून ऑनलाइन प्रणालीच्या मंदावलेल्या गतीमुळे इच्छुक उमेदवारांची मोठी अडचण झाली होती. याबाबत राज्यभरातून तक्रारी प्राप्त होत असल्याने इच्छुक उमेदवारांनी पारंपरिक पद्धतीने अर्थात ऑफलाईन पध्दतीने आज सायंकाळी ५:३० वाजेपर्यंतच्या वाढीव मुदतीत आपला उमेदवारी अर्ज सादर करण्याची मुभा काल सायंकाळी राज्य निवडणूक आयोगाने एका पत्राद्वारे जाहीर केली आहे. त्यामुळे या उमेदवारांची पुन्हा नव्याने सुरू झालेली धावपळ मुरबाडमध्ये पाहायला मिळत आहे.
राज्यभर लागू असलेल्या या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूकींमध्ये मुरबाड (Murbad) तालुक्यातील ४४ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून इंटरनेट द्वारे ऑनलाइन फॉर्म भरण्याच्या डिजिटल प्रणालीवर लोड आल्याने सर्फिंगचा वेग मंदावला असतांना उमेदवारांचे फॉर्म सबमिट होतांना त्रास होत आहे. याबाबत राज्य निवडणूक आयोगाकडे मोठ्या प्रमाणात तक्रारी सादर झाल्याने वेळेची मर्यादा पाहता काल सायंकाळी पारंपरिक पद्धतीने अर्थात ऑफलाईन पद्धतीने फॉर्म स्वीकारण्याचे आदेश स्थानिक निवडणूक विभागांना दिले आहे. त्यामुळे या उमेदवारांची पुन्हा एकदा मोठी धांदल उडाल्याचे पाहायला मिळत आहे.
इच्छुक उमेदवारांना जरी ऑफलाईन फॉर्म सादर करण्याची मुभा दिलेली असली तरी मुरबाड तहसिल कार्यालयात हे ऑफलाईन फॉर्म उपलब्ध नसल्याने बाहेरील खासगी झेरॉक्सच्या दुकानात या उमेदवारांची मोठी गर्दी झालेली आहे. काही जुन्या जाणत्या, तज्ञ मंडळीच्या सल्ल्यानुसार ऑफलाईन फॉरमॅट तयार करून तहसीलदार कार्यालयातून खात्री करून त्याच्या झेरॉक्स वितरित करण्याचे काम काल सायंकाळी युद्धपातळीवर सुरू होते. त्यामुळे आता यानंतर आणखीन काय नवे अडथळे समोर उभे राहतात? याबाबत या उमेदवारांमध्ये चिंताजनक चर्चा सुरू आहे.
( किशोर गायकवाड )
___________________________________________
【 संतापजनक : न्यू इंग्लिश स्कूलच्या नव्या तुघलकी फतव्याने मुरबाडमधील विद्यार्थ्यांचे शिक्षण धोक्यात? 】




0 Comments