दे धक्का! न्यायहक्कांसाठी फेरीवाल्यांचा नगर पंचायतवर हल्ला बोल...


दे धक्का! न्यायहक्कांसाठी फेरीवाल्यांचा नगर पंचायतवर हल्ला बोल...


लेबर फ्रंटच्या दणक्याने प्रशासनाला जाग!

[ KISHOR K. GAIKWAD ]

मुरबाड : (दि. २३) शहराच्या मुख्य बाजारपेठेतील फेरीवाल्यांच्या न्यायहक्कांसाठी लेबर फ्रंट युनियन तर्फे आज मुरबाड नगर पंचायतवर हल्लाबोल करण्यात आला.

  लेबर फ्रंट युनियनच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षांपासून मुरबाड शहराच्या मुख्य बाजारपेठेतील फेरीवाले आपल्या न्यायहक्कांसाठी संघर्ष करीत असून आज पुन्हा नगर पंचायत प्रशासनाला जागे करण्यासाठी लेबर फ्रंटचे सर्वेसर्वा श्यामदादा गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली व मुरबाड युनिटचे समन्वक रविंद्र चंदने यांच्या नेतृत्वाखाली शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते नगर पंचायत कार्यालया पर्यंत घोषणाबाजी करत पायी मोर्चा काढला. यावेळी अनेक फेरीवाल्यांनी आपल्या समस्या जाहीरपणे मांडल्या तसेच यापुढे कोणत्याही फेरीवाल्याला पंचायत प्रशासनाकडून त्रास झाल्यास लेबर फ्रंट युनियन आक्रमक भूमिका घेईल, असा इशारा रविंद्र चंदने यांनी आपल्या भाषणातून दिला.

 मुरबाड नगरपंचायत हद्दीतील फेरीवाले, पथविक्रेते, टोपलीधारक यांची नोंदणी करावी, पथविक्रेते कायदा लागू करावा, अन्यायकारक दैनंदिन कर वसुली रक्कम कमी करावी, मुख्य रस्त्याच्या बाजुतील फेरीवाले यांचे व्यवसाय ठिकाण निश्चित करावे, नगर पंचायतमधील कर्मचाऱ्यांची मनमानी बंद करावी अशा विविध मागण्यांसाठी आज मुरबाड नगर पंचायतवर हल्लाबोल करण्यात आला. 
 
  गेल्या अनेक वर्षांपासून मुरबाडचे फेरीवाले मुरबाड नगर पंचायतकडे आपल्या हक्कांची मागणी करीत असून अनेकदा आंदोलने, उपोषणे व मोर्चे घेऊन ते नगर पंचायतवर धडकले व प्रशासनाला आपल्या हक्कांची जाणीव करून दिली. या दरम्यान अनेक मुख्याधिकारी बदलले, लोकप्रतिनिधी बदलेले, मात्र या फेरीवाल्यांच्या मागण्यांना अपेक्षित न्याय मिळाला नसल्याने आज पुन्हा या फेरीवाल्यांना धडक मोर्चा द्वारे नगर पंचायतला जागे करावे लागले. मात्र आजच्या मोर्चाची दखल घेऊन मुख्याधिकारी कंकाळ यांनी उद्यापासून फेरीवाल्यांच्या प्रश्नांना मार्गी लावण्यासाठी उपाययोजना आखण्याचे आदेश कार्यालयाला दिल्याने मोर्चेकऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे. त्यामुळे अनेक वर्षांपासून खितपत पडलेल्या शहरातील फेरीवाल्यांच्या प्रश्नांना आता पूर्णविराम मिळण्याची चिन्हे दिसत असून फेरीवाल्यांना दिलासा मिळणार आहे. याप्रसंगी तालुक्यातील विविध सामाजिक - राजकीय, पक्ष - संघटनांनी या मोर्चाला पाठिंबा दिला.

किशोर गायकवाड )
___________________________________________



पत्ता : अंजनी गॅस सर्व्हिसच्या बाजूला, मेन रोड, मुरबाडसंपर्क : ८८०५०८३९४३

(शब्द मशालच्या कोणत्याही बातमीमध्ये काही त्रुटी, सूचना, दुरुस्ती अथवा मार्गदर्शन असेल तर वाचकांनी कृपया खालील कमेंट बॉक्समध्ये कळवावे ही विनंती)

0 Comments