अत्यंत खेदात्मक : मुंबईची तहान भागविणाऱ्यांची चक्क पाण्यासाठी पायपीट... [ Shabd Mashal - Kishor Gaikwad ]

 अत्यंत खेदात्मक : मुंबईची तहान भागविणाऱ्यांची चक्क पाण्यासाठी पायपीट...


वाचा सविस्तर वृत्त

[ KISHOR K. GAIKWAD ]

मुरबाड : ( किशोर गायकवाड ) मुंबईच्या लाखों करोडों लोकांना पाणी मिळावा म्हणून आपल्या घर-जमिनींचा त्याग करणाऱ्या कोळे वडखळच्या कुटुंबांवरच आज चक्क पिण्याच्या पाण्यासाठीच पायपीट करण्याची परिस्थिती ओढवली आहे. एवढेच नव्हे तर या बारवी प्रोजेक्टमुळे आजवर शासनाच्या कोट्यवधी रुपयांची उलाढाल झाली असतांना ही पीडित कुटुंबे चक्क आपल्या हक्काच्या घरापासून आजपर्यंत वंचित असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे मुरबाड तालुक्यातील १,२०४ कुटुंबांना विस्थापित करणारे बारवी धरण प्रकल्प हल्ली पुन्हा वादग्रस्त चर्चेचा विषय बनला आहे. 

  नुकताच आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी बारवी धरण प्रकल्प पीडित सेवा संघ, मुरबाड यांनी मुरबाड तहसील समोर एकदिवसीय उपोषणाची भूमिका घेतली होती. मात्र एम. आय. डी. सी. विभागात नवीन अधिकारी वर्गाची भरती झाली की बारवी प्रकल्प नेते आपला उपद्रव मूल्य दाखविण्यासाठी असे स्टंट करीत असल्याचे बोलले जात आहे.

  धरणाची उंची वाढविल्याने मागील वर्षी जुलै महिन्यापासून ग्राम पंचायत फणसोली अंतर्गत येणाऱ्या या कोळे वडखळ गावचा मुख्य रस्ता बारवीच्या पाण्याखाली गेला. तसेच एम. आय. डी. सी. ने मान्य केलेल्या सुविधा काही मोजक्या लोकांनाच दिल्याने त्या वस्तीतील सुमारे ३० कुटुंबानी एम. आय. डी. सी. च्या मालकीच्या सर्व्हे नंबर ४१/२ मध्ये झोपड्या बांधून आपला संसार मांडला आहे. यांना कोणतीही मूलभूत सुविधा न पुरवल्याने श्रमिक मुक्ती संघटनेच्या ऍड. इदंवीताई तिळपुळे यांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये दाद मागितली होती. त्या अर्जाचे रूपांतर जनहित याचिकेत करून मा. न्यायालयाने बारवी धरण बाधित गांवाना मूलभूत सुविधा देण्याचे निर्देश केले आहेत. त्यांची अंमलबजावणी जिल्हाधिकाऱ्यांनी स्थानिक प्रशासना मार्फत करणे क्रमप्राप्त आहे. मात्र याबाबतचे आदेश असतांना ही कोळे वडखळ येथील आदिवासींना सुमारे अर्ध्या किलोमीटर पासून डोक्यावर पाणी आणावे लागत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. 

   याबाबत या वस्तीतील नागरिकांना विचारणा केली असता एम. आय. डी. सी. चे अधिकारी हे फक्त बारवी धरण प्रकल्प पीडित सेवा संघाच्या लोकांचे ऐकून पक्षपातीपणाने आमच्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे सांगत आहेत. तसेच आजपर्यंत आम्हांला विद्युत सोय नाही, पिण्याच्या पाण्यासाठी एखाद्या बोरिंगची व्यवस्था अपेक्षित असतांना ती ही दिली नाही. एम. आय. डी. सी. च्या अधिकाऱ्यांनी फक्त रस्ते व भराव टाकून लाखों रुपये पाण्यात कमावले आहेत. मुळात ज्या रस्त्याची मागणी नसतांना ही निव्वळ टक्केवारीसाठी एम. आय. डी. सी. आणि संघटना आमच्या नावाने पैसा खर्च करत असल्याचा धक्कादायक प्रकार ते सांगत आहेत.

  "माझा सासरा आज पुनर्वसन होईल उद्या होईल अशा आशेवर मेला व आता आम्ही पण साठ सत्तर वर्षांचे झालो. बारवी नेत्यांनी आम्हाला पुढं करून मोठी बंगली बांधली पण आमच्या वाट्याला साधे हक्काचे घर मात्र आले नाही. किती दिवस सरकारच्या आशेवर जगायचे?"

   - साक्री बाई, बारवी प्रकल्प पीडित, कोळे वडखळ

  "मी नुकताच चार्ज घेतला आहे. कोळे वडखळ येथील नागरिकांबाबत मला अद्याप काही माहिती नाही. पण लवकरच त्याठिकाणी भेट देऊन येथील समस्या मार्गी लावण्याचा प्रयत्न केला जाईल"

   -सचिन राक्षे, कार्यकारी अभियंता, अंबरनाथ(एम. आय. डी. सी. विभाग)



वाचा: हिरव्या रंगाची झाडी घनदाट... सांगा मित्रहो दिसतो कसा सिद्धगडचा थाट..? - [ SIDDHAGAD - KISHOR K. GAIKWAD ]


आमच्या फेसबुक पेजला झटपट भेट देण्यासाठी येथे क्लिक करा ]


Creative Science Hub - Murbad
Creative Science Hub - Murbad

Zoom online lectures are started. Dont  miss the chance to enroll yourself.

To Enroll Contact on Below Number
8308922200 / 9404139039 / 8779945407


(शब्द मशालच्या सदर बातमीमध्ये अथवा कोणत्याही बातमीमध्ये काही त्रुटी, सूचना, दुरुस्ती अथवा मार्गदर्शन असेल तर वाचकांनी कृपया खालील कमेंट बॉक्समध्ये कळवावे ही विनंती)

0 Comments